Monkey Viral Video: माणूस असो वा प्राणी… आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकणं ही नैसर्गिक प्रवृत्तीच! मुलांवर संकट आलं तर आई-वडील ढाल बनून उभे राहतात, हेच आपण नेहमी पाहतो. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ या सगळ्या समजुतींना धक्का देणारा आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड आपल्या चिमुकल्या पिल्लासोबत अशी काही कृती करते की, ते पाहून नेटकऱ्यांचेही डोळे पाणावले.
प्राण्यांमध्येही प्रेम, माया व आपुलकी असते, असं आपण नेहमी ऐकतो… पण जर त्यातील एखाद्यानं आपल्या लेकराला मृत्यूकडे ढकललं तर? असा प्रकार ऐकूनही अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरारक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एका माकडानं आपल्या चिमुकल्या पिल्लाला उंच कड्यावरून खाली सोडल्याचं दिसतं आणि तो क्षण पाहून नेटकरी अक्षरशः थरारले. ‘आई-वडील आपल्या लेकरासाठी प्राण पणाला लावतात’ ही समजूत चक्काचूर करणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एकच प्रश्न पडतो – अखेर त्या माकडानं असं का केलं?
हा व्हिडीओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एका डोंगराळ भागात माकड आपल्या लेकराला मांडीवर घेऊन बसलेलं दिसतं. काही क्षणांतच ते माकड अचानकपणे आपल्या बाळाला वरून खालच्या खोल दरीत फेकून देतं. छोटं पिल्लू उतारावरून घसरत सरळ खोल दरीकडे पडताना दिसतं. पुढे काय झालं, ते मात्र कॅमेऱ्यात कैद झालेलं नाही. पण ज्या उंचीवरून ते पिल्लू कोसळतंय, ते पाहून कुणालाही असं वाटतं की, त्याचा जीव वाचणं कठीणच!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर @TheeDarkCircle या आयडीवरून शेअर करण्यात आलेल्या या १५ सेकंदांच्या व्हिडीओनं नेटकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ सात लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. हजारो लोकांनी लाइक, शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एका युजरने लिहिलं – “आम्हाला नेहमी सांगितलं जातं की, प्राणी संवेदनशील असतात, तेही माणसांसारखंच प्रेम करतात. मग हे काय?” तर दुसऱ्यानं प्रश्न केला– “हा व्हिडीओ शूट करणाऱ्यानं त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही?” अनेकांनी त्याला प्राण्यांवरील क्रूरता म्हणत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ पाहून प्रत्येकालाच प्रश्न पडतो– अखेर माकडानं असं का केलं असेल? पिल्लू आजारी होतं का? की आई-बाबा माकडाच्या मनात काही वेगळाच विचार होता? याचं खरं कारण अद्याप कुणालाही समजलेलं नाही; पण दृश्य पाहून हृदय दडपून जातं.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, लोकांमध्ये कुतूहल आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.