Mumbai Auto Driver Viral Video: सध्या मुंबई म्हटलं की, पाऊस आणि पाऊस म्हटलं की वाहतूक कोंडी, असं जणू समीकरणच झालं आहे. अशा या परिस्थितीत एखाद्याला जर एंटरटेन्मेंटचा डोस मिळाला तर? अगदी असंच काहीसं घडलंय आणि आता सोशल मीडियावर त्याचाच व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे.

मुंबईच्या मुसळधारेमध्ये लोक पावसापासून बचाव करीत घरी लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत शोधत होते, रस्ते पाण्याखाली गेले होते, वाहतूक कोंडी झाली होती… पण याच पावसात एका साध्या ऑटोचालकानं असं संगीतमय वातावरण तयार केलं की, त्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला गेलाय.

या रिक्षाचालकानं किशोर कुमार यांचं सदाबहार गाणं ‘छूकर मेरे मन को’ इतक्या आत्मीयतेनं आणि सुरेल आवाजात गायलं की प्रवासीच नव्हे, तर लाखो नेटिझन्स अक्षरशः भावूक झाले. पावसाच्या सरी झेलत, रिकाम्या रस्त्यावरून येणारा त्यांचा आवाज थेट लोकांच्या मनाला भिडला आणि आता सर्वत्र फक्त याच ऑटोवाल्याच्या गायकीची चर्चा आहे.

होय! मुंबईच्या मुसळधार पावसात एका ऑटोचालकाच्या गाण्यानं असं गोड गजलमय वातावरण रंगलंय की त्या गायकीनं प्रवाशांची मन जिंकून घेतलीत. ऑटोरिक्षा चालक सत्यवान गीते यांनी आपल्या सुरील्या आवाजात किशोर कुमार यांचं सदाबहार गाणं ‘छूकर मेरे मन को‘ इतक्या भावपूर्णतेनं गायलंय की, ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटाच आलाय. पावसाच्या सरी कोसळत होत्या, वारा सुटलेला होता; पण सत्यवान मात्र पावसाकडे दुर्लक्ष करून मनापासून गात होते.

हा व्हिडीओ एक प्रवासी – स्विनी डायस हिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिनं, ‘फक्त मुंबईतच तुम्ही राइड बुक केली, की बोनस म्हणून लाइव्ह कॉन्सर्टही मिळतो’, अशी मजेशीर कॅप्शनही दिली. खरंच, या वाक्यानं सत्यवानचा जलवा आणखीच गाजला.

सत्यवान गीते हे काही पहिल्यांदाच चर्चेत आलेले नाहीत. याआधीही ते ट्रॅफिक जॅममध्ये अचानक ‘कराओके सेशन’ सुरू करून लोकांना खूश करताना दिसले होते. त्यावेळीही त्यांच्या गायकीनं अनेक नेटिझन्सची मनं जिंकली होती. आता पुन्हा त्यांच्या या नव्या व्हिडीओनं इंटरनेटवर त्यांचं नाव गाजत आहे.

स्विनीनं या व्हिडीओमध्ये एक गमतीशीर खुलासा केला. तिनं म्हटलं – “मित्रांनो, मूळ ऑडिओ पावसाच्या आवाजात विरला; पण सत्यवानची ऊर्जा? अजूनही १००% वॉटरप्रूफ!” हे ऐकून लोकांनी कौतुकाचा वर्षाव केला.

नेटिझन्सनी कमेंट बॉक्स भरून टाकला आहे. कुणी लिहिलं – “त्यांचा आवाज अगदी ओरिजिनलसारखा आहे,” तर कुणी म्हटलं – “फक्त शुद्ध मनाचे लोकच अशा कल्पना आणू शकतात.” काहींनी तर म्हटलं – “मुंबई अजूनही जिवंत आहे. कारण- इथे अशा मनमिळाऊ माणसांचं अस्तित्व आहे.”

या एका साध्या ऑटोवाल्यानं मुंबईकरांच्या आणि लाखो ऑनलाइन प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. पाऊस, गडबड, ट्रॅफिक – हे सगळं विसरून लोक फक्त त्या आवाजात हरवून गेले.

जर तुम्ही अजून हा व्हिडीओ पाहिला नसेल, तर नक्की पाहा. कारण- विश्वास ठेवा की, एकदा ऐकल्यावर तुम्हीही या ऑटोवाल्याचे फॅन व्हाल.

येथे पाहा व्हिडीओ