Nigerian Kids Dance on Deva Shri Ganesha: गणेश चतुर्थीचा उत्सव म्हणजे भक्तिभाव, उत्साह, नृत्य, संगीत व रंगतदार जल्लोष. पण, यंदा सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्याने सगळ्यांच्याच डोळ्यांत चमक आणली आहे. कारण- हा व्हिडीओ भारतातील नाही, तर दूर आफ्रिकेतील नायजेरियामधील आहे. आणि त्यात दिसतंय काहीसं असं की – अगदी गणरायाच्या भजनावर परदेशांतले लहानगे थिरकताना दिसतात.

होय, अगदी बरोबर वाचलंत. नायजेरियातील एका शाळेतील मुलांनी बॉलीवूडच्या ‘अग्निपथ’ चित्रपटातील गाजलेलं गाणं ‘देवा श्री गणेशा’ यावर असा झंझावाती डान्स सादर केला की, भारतीय नेटिझन्स अक्षरशः थक्क झाले. लाल रंगाच्या एकसारख्या पोशाखात सजलेले हे विद्यार्थी मंचावर आले आणि गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर इतक्या अचूक लयीत थिरकले की, पाहणाऱ्यांच्या अंगावर काटाच आला.

त्यांच्या डान्समधला उत्साह, चेहऱ्यांवरचा आत्मविश्वास व गणरायाच्या गाण्याशी असलेलं नातं हे सगळं पाहून भारतीय प्रेक्षक भारावून गेले आहेत. व्हिडीओमध्ये मुलं उंच आवाजातल्या बीट्सवर हात जोडून, ऊर्जेने ओतप्रोत भरलेल्या हालचाली करताना दिसतायत. एका क्षणी तर वाटतं की, हे सारे लहानगे जणू गणपती बाप्पालाच आपल्या नृत्याद्वारे अभिवादन करीत आहेत.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ dreamcatchersda नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून, त्यात कॅप्शनमध्ये लिहिलं आहे– “नमस्ते भारत, आम्हाला आशा आहे की, तुम्हाला हे आवडेल.” या एका वाक्यानं भारतीय नेटिझन्सची मनं जिंकून घेतली आहेत. इतकंच नव्हे, तर हा परफॉर्मन्स भारतापुरताच थांबलेला नाही; अमेरिका, युरोपसह इतर देशांमधूनही त्याला खूपच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडियावर तर या व्हिडीओनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक व ट्विटरवर लोक सतत हा डान्स शेअर करीत आहेत. भारतीयांनी कमेंटमध्ये लिहिलं – “हा खरा गणपती उत्सव! सीमांच्या पलीकडेही बाप्पाचं नाव पोहोचलंय.” काहींनी तर या मुलांची तुलना व्यावसायिक डान्सर्सशी केली आहे.

सगळ्यात खास गोष्ट म्हणजे या नृत्यातून संस्कृतींचं एकत्रीकरण दिसून आलं. एका बाजूला नायजेरियाची निरागस लहानगी मुलं, तर दुसऱ्या बाजूला भारतातील भगवान गणेशाची आराधना. या दोघांच्या या संगमातून एक असा परफॉर्मन्स घडून आलाय की, जो पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान दाटून आलाय.

जर तुम्ही अजून हा व्हिडीओ पाहिला नसेल, तर नक्की बघा… कारण- विश्वास ठेवा, एकदा पाहिल्यावर तुम्हीही या मुलांचे फॅन व्हाल!

येथे पाहा व्हिडीओ