दिवमधील समुद्रकिनाऱ्यावर पॅरासिलिंग करत असतानाच अचानक दोर तुटला आणि दांपत्य पॅराशूटसोबत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ३० वर्षीय अजित आपल्या पत्नी सरलासोबत दिवमधील नागोवा बीचवर पॅरासिलिंग करत असताना पॅराशूटचा दोर तुटला. यानंतर काही काळ हे दांपत्य पॅराशूटसोबत हवेतच भिरकत होतं.
गुजरातमधील हे दांपत्य सुट्ट्यांसाठी दिवमध्ये आलं होतं. सुदैवाने त्यांना या दुर्घटनेत कोणतीही इजा झाली नाही. त्यांनी लाईफ जॅकेट घातलं असल्याने वेळीच त्यांना वाचवण्यात आलं. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत हवेत झेपावल्यानंतर काही वेळातच पॅराशूटचा दोर तुटतो आणि ते हवेत फेकले जात असल्याचं दिसत आहे. यानंतर बोटीवर एकच गोंधळ उडाला होता.
अजितचा भाऊ राकेश यावेळी बोटीवर उपस्थित होता. राकेश आपल्या मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. दोर तुटताच सुरु असलेला आरडाओरडा या व्हिडीओत ऐकू येत आहे. “मी व्हिडीओ रेकॉर्ड करत होतो. दोर तुटल्यानंतर काय करावं याची आम्हाला काहीच कल्पना नव्हतं. मी माझा भाऊ आणि वहिनीला उंचावरुन खाली पडताना पाहिलं. काहीच करु शकत नसल्याने त्या क्षणी मला वाटलं तितकं असहाय्य याआधी कधीच वाटलं नव्हतं,” असं त्याने सांगितलं आहे.
दरम्यान दुर्घटनेनंतर पॅरासिलिंग सेवा देणाऱ्या पाल्म्स अॅडव्हेंचर आणि मोटरस्पोर्ट्सच्या लाईफगार्ड्सने त्यांना वाचवलं. राकेशने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण दोर योग्य स्थितीत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं असा दावा केला आहे. पण काहीही होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं असंही त्याने सांगितलं आहे. पाल्म्स अॅडव्हेंचर आणि मोटरस्पोर्ट्सने हवेचा वेग जास्त असल्याने दुर्घटना झाल्याचं म्हटलं आहे. दांपत्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलं होतं, मात्र तक्रार न करताच परतलं.