आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा सोहळा मुंबईसह देशभरात पार पडला. देशभरात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले होते. त्याचप्रमाणे लंडन या ठिकाणीही गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. तिथला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि त्यावरुन वाद सुरु झाला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊ.

नेमकं व्हायरल व्हिडिओचं प्रकरण काय?

युकेमधील लंडन या ठिकाणी असलेल्या नदीत होडीतून गणेशमूर्ती घेऊन भक्त जात आहेत. त्यानंतर ते पारंपरीक पद्धतीने गणपतीचं विसर्जन करत आहेत. मात्र या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. यानंतर नेमका वाद काय झाला आपण जाणून घेऊ.

नेमका वाद काय निर्माण झाला?

लंडनमधला हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सनी लंडनमधल्या भारतीयांनी परंपरा पाळली आणि संस्कृती जपली म्हणत आनंद व्यक्त केला आहे. तर काही युजर्सनी तुम्ही सरळ सरळ पर्यावरणाचा ऱ्हास करत आहात असं म्हटलं आहे. एक युजर म्हणतो तुम्ही परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं. तुम्हाला अगदी तुमच्या घरी म्हणजेच मायदेशी असल्यासारखं वाटत असेल. तर काही युजर्सनी हा पर्यावरणाचा ऱ्हास असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही जी मूर्ती विसर्जित करत आहात ती पर्यावरणपूरक आहे का? त्याची खात्री तुम्ही केली आहे का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने म्हटलं आहे तुम्ही अशा पद्धतीने विसर्जन करुन भारतातील नद्या, तलाव आणि समुद्राचं पाणी प्रदुषित केलं आहे, आता तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाणी प्रदूषण करत आहात. त्यापेक्षा घरी टबमध्ये घरगुती पद्धतीने मूर्तीचं विसर्जन करा. पृथ्वी वाचवा, पर्यावरण वाचवा असं म्हटलं आहे.

थर्माकोलचे दागिने का काढले नाहीत? युजर्सचा सवाल

आणखी एक युजर म्हणतो तुम्ही विसर्जन करण्याची ही अत्यंत चुकीची पद्धत अवलंबली आहे. मूर्तीच्या गळ्यातील प्लास्टिकच्या माळा कोण काढणार? थर्माकोलचे दागिनेही पर्यावरणपूरक नाहीत. तसंच रंगही विषारी असतात. ते पाण्यात मिसळल्यावर काय होईल? दुसरीकडे आणखी एक युजर म्हणतो ती मूर्ती मातीची आहे. लोक का उगाच प्रश्न उपस्थित करत आहेत? तर आणखी एक जण म्हणतो आहे की किमान मूर्तीवरचे प्लास्टिक आणि थर्माकोलचे दागिने तर काढा. संदीप आंतवाल यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यावर विविध कमेंट येत आहेत. एकीकडे महाराष्ट्रसह देशभरात विसर्जनाचा उत्साह दिसून आला. तर लंडन येथील या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे.