Viral Video Dog Tied In Train : बिहारच्या रक्सौल येथे धक्कादायक घटना घडली आहे. समस्तिपूरला जाणारी ट्रेन क्रमांक ५५५७८ एक तास उशिरा सोडण्यात आली आहे, कारण काय तर ट्रेनमधील कोचमध्ये सीटला बांधून ठेवलेला पांढरा श्वान. बराच वेळ हा श्वान भुंकत होता आणि आपली सुटका व्हावी यासाठी तडफडताना दिसत होता. यादरम्यान श्वान भुंकून प्रवाशांवर हल्ला करण्याचा प्रयत्नही करत होता; ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सीटला बांधून ठेवल्यामुळे प्रवाशांना संशय आला की, कदाचित मालक त्याला ट्रेनमध्ये सोडून गेला आहे, यामुळे ही घटना प्रचंड व्हायरल झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांना आश्रयस्थानात हलवण्याचा आणि सार्वजनिक ठिकाणी सोडण्यास मनाई करण्याच्या आदेशाविरुद्ध सुरू असलेल्या निषेधादरम्यान, बिहारमधील हा व्हिडीओ विचार करायला भाग पाडणारा आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, श्वानाला प्रवाशांच्या सीटवर साखळदंडाने बांधून ठेवल्यामुळे आणि गोंधळलेल्या प्रवाशांना पाहून रेल्वे कर्मचाऱ्यांनी मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर प्रवाशांच्या आणि श्वानाच्या सुरक्षेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तो डबा पूर्णपणे रिकामा केला आणि श्वानाला बांधून ठेवून ट्रेन प्रवास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

“आता सर्वोच्च न्यायालय कुठे आहे” (Pet Dog Viral Video)

यामुळे सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी निघणारी ही ट्रेन नियोजित वेळेपेक्षा सुमारे ८० मिनिटे म्हणजे सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी रक्सौलहून निघाली. एनडीटीव्हीने वृत्त दिल्याप्रमाणे, रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. श्वानाला डब्यात बांधणे केवळ असुरक्षितच नाही तर रेल्वेच्या कामकाजात गंभीर व्यत्यय आणणारे आहे; असे रेल्वे व्यवस्थापनाच्या एका सदस्याने म्हटले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @streetdogsofbombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. काहीतरी वाईट घडण्यापूर्वी श्वानाला वाचवण्यासाठी आणि रक्सौल, समस्तिपूर जवळची एखादी स्वयंसेवी संस्था किंवा प्राणीप्रेमींपैकी कोणीतरी मदत करायला पुढे येईल अशी अपेक्षा ठेवून पोस्ट करण्यात आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा प्राण्यांच्या सार्वजनिक सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. व्हिडीओवर अनेक नेटकरी “आता सर्वोच्च न्यायालय कुठे आहे, त्यांना श्वानाचे हे दुःख दिसत नाही का? सीसीटीव्ही तपासा, तुम्हाला मालक लवकरच सापडेल”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.