Shocking video: रस्त्यांवर कधी काय घडेल ते सांगता येत नाही. कित्येकदा डोळ्यांसमोर क्षणार्धात जीवघेणे प्रसंग उभे राहतात. त्याचं एक उदाहरण पिलीभीतच्या या अपघातात दिसलं. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात रविवारी दुपारी भीषण अपघात टळला. गवतानं भरलेला ट्रक अचानक उलटून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर आदळला. अवघ्या काही क्षणांत मोठा अनर्थ घडला असता, पण कारमध्ये बसलेले चार जण वेळीच बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले.

ही घटना एनएच-७३० महामार्गावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ॲक्सल तुटल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर उलटला. त्या कारमध्ये दोन लहान मुले आणि दोन प्रौढ सदस्य होते. अपघाताच्या काही सेकंदे आधीच ते कारमधून बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अपघातानंतर कार पूर्णपणे चिरडून गेल्याचे दिसून आले.

या प्रसंगामुळे आसपासचे लोक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. कारमध्ये कोणीही नसल्याचे लक्षात येताच सर्वांच्या जीवात जीव आला. मात्र, या घटनेनंतर ओव्हरलोडेड ट्रकमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला किती मोठा धोका निर्माण होतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, महामार्गावर अशाी अवजड व जड वाहने नेहमीच धावत असतात आणि प्रशासनाकडून त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात नाही.

पाहा व्हिडिओ

घटनेचा संपूर्ण प्रकार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ @pixelsabhi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. फक्त काही सेकंदांत ट्रक कारवर कोसळतानाचे दृश्य पाहिल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. नेटिझन्सनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करीत ट्रक ओव्हरलोडिंगवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या अपघाताबाबत पोलिस ठाण्याचे प्रभारी पवन पांडे यांनी माहिती दिली की, अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तर, क्षेत्रीय परिवहन अधिकारी (ARTO) वीरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ट्रकचा ॲक्सल तुटल्यामुळे हा अपघात झाला. सध्या ट्रक महामार्गाच्या कडेला उभा करून ठेवण्यात आला आहे.

या घटनेमुळे रस्ते सुरक्षा आणि वाहन तपासणी व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. जड मालवाहतुकीच्या वाहनांवर योग्य तपासणी होत नाही, तसेच चालकांकडून नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक विभागाने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

दरम्यान, पिलीभीतमधील या घटनेनंतर काही तासांतच उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे आणखी एक अपघात घडला. डोंगराळ भागात मोठा दगड अचानक घसरून आरोग्य अधिकाऱ्यांच्या गाडीवर कोसळला. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून, त्यात बसलेले दोन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.