कोरोना काळापासून स्वच्छता आणि निरोगी आहार खाण्यावर अधिक भर देण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे प्रत्येकजण आरोग्याची चांगल्याप्रकारे काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात विशेषत: रुग्णालयात नागरिकांच्या आरोग्याविषयी अधिक सजगता बाळगली जाते. पण रायबरेलीतील एका रुग्णालयात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये भाजी बनवण्यासाठी वापरले जाणारे बटाटे चक्क पायात बूट घालून धुवत असल्याचे समोर आले आहे. हा किळसवाणा व्हिडीओ रायबरेली एम्स या सरकारी रुग्णालयातील आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये एक व्यक्ती पायात बूट घालून बटाटे धुवत आहे. या धुतलेल्या बटाट्यापासूनचं रुग्णालयातील रुग्ण आणि परिचारिकांसाठी भाजी बनवली जाते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एम्स प्रशासनाच्या मीडिया सेलने कारवाई करण्याऐवजी त्रुटींवर पांघरूण घालत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे, तर दुसरी व्यक्ती पायात बूट घालून एका मोठ्या पातेलयात उभा राहून बटाटे धुवत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकरीही सडकून टीका करत आहेत.

पायात बूट घालून चिरडले जातात बटाटे

व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचे सांगताना एम्सचे मीडिया पीआर प्रभारी डॉ. शुक्ला यांनी सांगितले की, त्यात दिसणाऱ्या कर्मचाऱ्याला १५ दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. एम्स प्रशासनाची बदनामी करण्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने या कर्मचाऱ्याने व्हिडिओ बनवून व्हायरल केला होता. मात्र, मीडिया ग्रुपला पाठवलेल्या उत्तरात त्यांनी कामावरून काढलेला कर्मचारी कॅन्टीनसारख्या संवेदनशील ठिकाणी कसा पोहोचला हे सांगितले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाने अद्यापही ठोस कारवाई केली नाही

व्हिडीओमध्ये पाहू असे वाटते की, या रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये बटाटे धुण्याची हीच पद्धत असावी. यामुळे देशातील सर्वात मोठे सार्वजनिक एम्स रुग्णालय बाहेरून चमकणारे दिसत असले तरी रुग्णालयाच्या आतील परिस्थिती भयावह आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. यामुळे भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासन कोणती कठोर भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.