Viral Video Security Guard Falls On Tracks : एखादी बिल्डिंग असो, ऑफिस असो किंवा एखादे मेट्रो स्टेशन देखरेख करण्यासाठी इथे सुरक्षा रक्षक नेमून दिलेले असतात. एकाच ठिकाणी बसून, डोळ्यांत तेल घालून सतत देखरेख करणे यांच्यासाठीही कठीणच जात असेल ना. कधी कधी तर एखाद्या खास कार्यक्रम असेल तर यांना वाढीव ड्युटी सुद्धा करावी लागते. तर आज असेच काहीसे बंगळुरूच्या सुरक्षा रक्षकाबरोबर घडले.

बंगळुरूच्या मेट्रो यलो लाईनवरील रागीगुड्डा मेट्रो स्टेशन क्रमांक २ वर तैनात असलेला सुरक्षा रक्षक ड्युटीवर असताना अचानक मेट्रोच्या रुळांवर पडला. ५२ वर्षीय सुरक्षा रक्षक, जो त्याच्या कामाच्या वेळेत प्लॅटफॉर्मवर सहज चालत होता. चालत चालत त्याचा डोळा लागला की काय माहिती नाही पण, हळूहळू तो प्लॅटफॉर्मवरून चालत चालत थेट खाली रुळांवर पडला. रुळांवर पडताच त्याला शुद्ध आली आणि तो घाबरून गेला. प्लॅटफॉर्मवर पुन्हा येण्यासाठी त्याने तेथील प्रवाशाला हाक मारली आणि मदतीची विनंती केली.

त्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील सुरक्षा रक्षकाने इमर्जन्सी ट्रिप स्विच (ETS) सक्रिय केला, ज्यामुळे ट्रॅकवरील वीज खंडित झाली. प्लॅटफॉर्मवर उपस्थित एका प्रवाशाने गार्डला मदत करण्यासाठी धाव घेतली आणि त्याला वर खेचले; त्यामुळे गार्डला कोणतीही दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. आपत्कालीन ट्रिप स्विच सक्रिय केल्यामुळे, मेट्रो सेवा सुमारे सहा मिनिटांसाठी थांबल्या आणि विस्कळीत झाल्या. द हिंदूच्या वृत्तानुसार, सुरक्षा रक्षक १६ तासांहून अधिक काळ ड्युटीवर होता; त्यामुळे ही घटना घडली. कामावर येण्यापूर्वी त्याने थोडाच वेळ विश्रांती घेतली होती.

बीएमआरसीएल अधिकाऱ्यांचा खुलासा

बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) च्या एका अधिकाऱ्याने द हिंदूला सांगितले की, घटनेनंतर लगेचच गार्डला ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आणि अशा वाढीव शिफ्टची कशी परवानगी देण्यात आली हे ठरवण्यासाठी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या मुद्द्याबाबत स्टेशन मॅनेजरशीही चौकशी करण्यात आली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bykarthikreddy या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आल्या आहेत. नेटकरी व्हिडीओ पाहून “सुरक्षा रक्षकांची नोकरी फक्त एक तासाच्या ब्रेकसह ९ तासांची करावी. सुरक्षा रक्षकांना १२ तास काम करणे चुकीचे आहे. सरकारने कंपन्यांना फक्त अशाच एजन्सींशी करार करणे बंधनकारक करावे जे आठवड्याची सुट्टी देतात आणि पीएफ आणि ईएसआय कव्हरसह ९ तासांची ड्युटी ठेवतात”, “वेतन कमी आणि काम जास्त . ४२ कोटी भारतीय कर्मचाऱ्यांची सुद्धा अशीच अवस्था आहे. निवडणुकीत हा मुद्दा कधीच बाहेर येत नाही” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.