Video Shows Parents Abandon Newborn Girl At Hospital : आज मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुली प्रत्येक क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. तरीही मुलासाठी सून हवी, आई हवी, प्रेयसी हवी, बहीण हवी; पण घरात जन्मलेली मुलगी नको, असा हट्ट आजही अनेकांचा आहे. पोटात वाढणाऱ्या त्या मुलीचा जन्म होण्याआधीच तिचा गळा घोटला जातो किंवा जन्म झाल्यानंतर तिला वाऱ्यावर सोडून दिले जाते. आज अशीच एक घटना हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका चिमुकलीचा नुकताच जन्म झालेला असतो; पण तिच्या घरच्यांनी दिला स्वीकारण्यास नकार दिलेला असतो.

डॉक्टर सुषमा (Sushma) यांनी @drsushmamogri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नवजात मुलीचा व्हिडीओ सोशल शेअर केला आहे. मुलगी जन्माला आल्यामुळे तिचे पालक खासगी रुग्णालयात तिला सोडून गेले. कारण – चिमुकलीच्या आईने आतापर्यंत तीन मुलींना जन्म दिला होता. नवजात चिमुकली ही आईची दुसरी मुलगी आहे आणि याआधी एका मुलीचा मृत्य झाला होता. त्यामुळे नवजात चिमुकलीचे कुटुंब नाराज आहे. त्यामुळे नवजात चिमुकलीच्या वडिलांनी सुद्धा विचारपूस करण्यासाठी एकही फोन केलेला नाही ; असे डॉक्टर व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत.

२१ व्या शतकात राहूनही, लोकांची अशी मानसिकता आहे (Viral Video)

आईने तिसऱ्या मुलीला जन्म दिल्यामुळे कुटुंबाने बाळाला हॉस्पिटलमध्येच सोडून जाण्याचा निर्णय घेतला. बाळंतपणानंतर बालिकेच्या वडिलांनी पत्नीची विचारपूस करण्यासाठी फोनही केला नाही. एक डॉक्टर, एक आई, एक मुलगी आणि एक महिला असल्यामुळे हा प्रसंग पाहून डॉक्टर सुषमा यांना खूप वाईट वाटले. भारतात महिला राष्ट्रपती आहेत, आपल्याकडे सुनीता विल्यम्ससारख्या महिला आहेत, ज्यांनी नऊ महिन्यांहून अधिक काळ अंतराळात घालवला आहे. हे बालिकादेखील नऊ महिन्यांचा प्रवास पूर्ण करून आणि भाग्य घेऊन जन्माला आली आहे. त्यामुळे २१ व्या शतकात राहूनही, लोकांची अशी मानसिकता आहे हे पाहून डॉक्टरसुद्धा थक्क झाल्या आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

डॉक्टर सुषमा यांचा व्हिडीओ पाहून मुलीला दत्तक घेण्याचे आणि तिला पात्र असलेले प्रेम देणारे मेसेज अनेक युजर्स पाठवू लागले आहेत. कुटुंबाच्या कृतीमुळे अनेक युजर्सना राग आला, तर काहींनी भारतात चांगल्या पालक व्यवस्थेची गरज असल्याचे मत अधोरेखित केले. त्यानंतर बाळाला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या लोकांकडून हजारो कॉल, मेसेज आल्यानंतर त्या नवजात बाळाच्या पालकांशी बोलल्या. नवजात बालिकेसाठी जनतेकडून मिळणारा पाठिंबा आणि प्रेमामुळे कुटुंबसुद्धा भारावून गेले आणि अखेर त्यांच्या चुकीची गंभीरता त्यांना कळली. जेव्हा त्यांनी पाहिले की, बरेच लोक त्यांच्या आयुष्यात बाळ व्हावं यासाठी प्रयत्न करीत आहेत तेव्हा त्यांचे डोळे उघडले. त्यामुळे आता ते त्यांच्या मुलीला प्रेमाने घरी घेऊन जाण्यास तयार आहेत, असे दुसऱ्या व्हिडीओत डॉक्टरांनी सांगितले आहे.