IndiGo Passenger Caught Stealing Life Jacket On Flight Viral video : बस, ट्रेन यापेक्षा विमानाचा प्रवास थोडा खास असतो. विमान प्रवासात अनेक सोई-सुविधा मिळतात; परंतु थोडा जास्त खर्च येतो. असे असले तरी प्रवाशांना उंचावर जाऊन जग पाहण्याची एक वेगळीच संधी मिळते. त्यामुळे हा प्रवास करण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. पण, काही जण असे असतात, जे तेथील सोई-सुविधांचा गैरवापर करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका प्रवाशाने चक्क विमानातून लाइफ जॅकेट चोरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. त्याची ही कृती खूपच धक्कादायक आहे.
व्हायरल व्हिडीओ विमान प्रवासातील आहे. इंडिगोच्या विमानातील हे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. @travel.instaagram या इृन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या छोट्या क्लिपमध्ये एका जागरूक सहप्रवाशाने अज्ञात प्रवाशाची चोरी पकडली आहे. जागरूक प्रवाशाने त्या अज्ञात प्रवाशाला बॅग उघडण्यास सांगितले; ज्याने लाइफ जॅकेट बॅगेत ठेवताना डोळ्यांदेखत पाहिले होते. त्यानंतर “तुमची बॅग उघडा”, असे म्हणून जागरूक प्रवासी म्हणतो आणि नंतर त्याच्या बॅगेतून पिवळे लाइफ जॅकेट काढतो.
एअरलाइन्समधून प्रवास करण्यास बंदी (Viral Video)
जागरूक प्रवासी पुन्हा एकदा त्या प्रवाशाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उभारून “तू हे नक्की काय करतो आहेस? लाइफ जॅकेट का चोरलं आहेस? मी तुला कधीपासून बघतोय, हे बरोबर नाही आहे. लाइफ जॅकेट प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असते”,; असे सांगून तो प्रवाशाला लाइफ जॅकेटचे गांभीर्य समजावतो. अज्ञात प्रवाशाची ओळख अद्यापही पटलेली नाही आणि व्हिडीओमध्ये त्याचा चेहरा जाणूनबुजून ब्लर करण्यात आला आहे. एकदा बघाच सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा प्रवाशांचा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @travel.instaagram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्स व्हिडीओ पाहून जागरूक प्रवाशाचे कौतुक करीत आहेत. तसेच अज्ञात प्रवाशाला शिक्षा म्हणून “त्याला आयुष्यभर कोणत्याही एअरलाइन्समधून प्रवास करण्यास बंदी घाला” , “विमानांमधील बहुतेक लोक सुशिक्षित असतात. तरीही अशा घटनांवरून असे दिसून येते की, सुशिक्षित व्यक्तींनाही व्यावहारिक धडे देण्याची गरज आहे आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.