Viral Video Creative Kids Costumes At Fancy Dress Competition : लहान मुलांसाठी नेहमीच फॅन्सी ड्रेस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात लहान मुलांचे एका खास वस्तू, पदार्थ किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींच्या रूपात त्यांचे रूपांतर केले जाते. शाळेत जाऊन किंवा कार्यक्रमात जाऊन मुलांना त्या वस्तूचं मनोगत किंवा मग कृती करून दाखवावी लागते. पण, या सगळ्यासाठी मेहनत चिमुकल्यांचे पालक घेत असतात. तर आज सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ पहायला मिळाला आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी एक खास पोशाख तयार केला आहे, जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
केरळमधील अडूर येथील ऑल सेंट्स पब्लिक स्कूलने आयोजित केलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील विद्यार्थ्याच्या जबरदस्त एंट्रीने सगळ्यांनाच थक्क करून सोडले आहे. एका विद्यार्थ्याचे कोणता पदार्थ किंवा वस्तूमध्ये नाही तर चक्क शहामृगामध्ये रूपांतर केले आहे. लांब आणि बळकट पाय, लांब मान, पंख, मानेला आणि शरीराला मऊ पिसे असे शहामृग पक्ष्याचे निरीक्षण करून त्या विद्यार्थ्याला या गुणधर्मांसह तयार केलं आहे. शहामृगाच्या वेशात असलेल्या या मुलाने आपल्या अद्भुत सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले.
“अरे ह्याला पहिले बक्षीस मिळाले पाहिजे” (Viral Video)
विद्यार्थी शहामृगाच्या पोशाखात स्टेजवर आला आणि जमलेल्या मंडळींमध्ये एकच हशा पिकली. एवढेच नाही तर या पर्फोमन्स दरम्यान फुगा म्हणून त्याने अंडी सुद्धा दिली या खेळकर हालचालीने प्रेक्षकांना गोंधळात टाकले. पोशाखामुळे मुलाला व्यवस्थित हालचाल करता येत नव्हती. म्हणून, त्याचे शिक्षक त्याला व्यवस्थित चालण्यास मदत करत होते. तसेच इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. कारण – शहामृगापुढे आपला टिकाव नाही हे कदाचित त्यांनी ठरवूनच टाकले होते. त्याचप्रमाणे शिक्षकांना तर हसू आवरत नव्हते.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ log.kya.kahenge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “ही नक्कीच त्याच्या बाबांची कल्पना असणार” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि “बाकीच्यांना समजलं आता आपण काय जिंकणार नाही”, “सगळ्यात क्रिएटिव्ह फॅन्सी ड्रेस कल्पना”, “सेव्ह करून ठेवते, माझ्या लेकीसाठी उपयोगी ठरेल”, “अरे ह्याला पहिले बक्षीस मिळाले पाहिजे” “काय अभिनय केलाय पोराने” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.