Viral Video: लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे सोशल मीडियावरही विविध लग्नातील अनेक सुंदर व्हिडीओ, फोटो व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. यातील काही व्हिडीओंमध्ये वधू-वराची भन्नाट एन्ट्री पाहायला मिळते, तर काही व्हिडीओंमध्ये वधू-वराच्या मित्र-मंडळींमध्ये भांडण, मजामस्ती पाहायला मिळते. शिवाय अनेकदा वधूची पाठवणी करताना तिचे नातेनाईक भावूक झालेले पाहायला मिळतात. आताही असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. पण, यामध्ये वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना भावूक झाल्याचे दिसत आहेत.

प्रेम ही एक सुंदर भावना आहे, त्यामुळे त्याचे वर्णन शब्दात केले तरीही ते कमी पडेल. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीने आपल्याबरोबर नेहमी आपल्या सुख-दुःखात राहावं, आपली सगळी स्वप्नं पूर्ण करावी, आपली काळजी घ्यावी असं सर्वांनाच वाटतं. शिवाय मुलगा असो किंवा मुलगी आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्या अशाच एका प्रेमाचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळत आहे, जो पाहून तुम्हाला तुमच्याही जोडीदाराची आठवण येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्न मंडपामध्ये वधू-वर एकमेकांसमोर गळ्यात वरमाला घालण्यासाठी उभे राहिले असून यावेळी एकमेकांना पाहून दोघेही रडायला सुरुवात करतात. यावेळी वधू वराच्या गळ्यात हार घालणार इतक्यात तो गुडघ्यावर बसतो आणि रडायला सुरुवात करतो. वधूदेखील त्याच्या गळ्यात हार घालताना रडू लागते. त्यांच्या आयुष्यातील हा अनमोल क्षण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील marathi_royal_karbhar या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि पन्नास हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “भाऊ दुनिया गेली उडत… मी तुझ्या खुशीत शामिल आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “यालाच बोलतात खरं प्रेम…. दोघांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे, या दिवसासाठी किती प्रयत्न केले असतील…”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “प्रेमाचे खरे समर्पण यालाच म्हणायचे का?”