Chandigarh Theft Incident Viral Video : रेल्वेस्थानक वा ट्रेनमध्ये प्रवाशांच्या, तसेच बाजारात, मॉलमध्ये गर्दीचा फायदा घेत अनेकांच्या खिशातून गुपचूप पाकीट काढण्यात चोर पारंगत असतात. पण, काही चोर मध्यरात्री घरात शिरून दागिने, पैसे, घरातील मौल्यवान वस्तू चोरण्याचाही प्रयत्न करतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी असो किंवा घरी आपल्या सामानाची चोरी होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे लागते. चोरी करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण, व्हिडीओतील या चोराने कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा पैसे चोरले नाहीत. पण, त्यांनी घराच्या गेटबाहेर ठेवलेल्या दोन कचराकुंडी पळवून नेल्या. या आश्चर्यकारक वाटणाऱ्या चोरीने सगळेच चकित झाले आहेत.

१४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चंदिगडमधील एका निवासस्थानाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची झलक दाखवण्यात आली आहे. त्यात दोन अज्ञात पुरुष आपली ओळख लपवण्यासाठी मास्क व हेल्मेट घालून दुचाकीवरून येतात आणि त्यापैकी एकाने निवासस्थानाचे गेट शांतपणे उघडले. घराबाहेर ठेवलेली कचराकुंडी उचलून लगेच दुचाकीवर बसला आणि मग दोघेही पळून गेले. ३७ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये स्कूटरचा वाहन क्रमांकही स्पष्टपणे दिसत नाही.

घरमालकाने हा सर्व प्रकार पाहिला आणि घरी चोरी झाल्याची तक्रार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तक्रार केली. चंदिगड पोलिसांना चोरांचा शोध घेण्यास आणि चोरांवर कारवाई करण्यास त्यांनी ही पोस्ट शेअर केली. त्या माणसाने त्याच्या (ट्विटर) एक्स पोस्टमध्ये “सेक्टर ३६ चंदिगड | @chandigarhpolice कचराकुंड्या पळवून नेणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात कृपया मदत करा. हे फक्त कचराकुंड्यांविषयी नाही, तर आमच्या परिसराच्या सुरक्षिततेबद्दल आहे. तुमच्या मदतीसाठी विनंती करत आहे”, अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

चंदिगड पोलिसांनीही घरमालकाच्या ट्विटवर कमेंट सेक्शनमध्ये, “या संदर्भात तुमच्या संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधा” अशी कमेंट केली आहे. या कमेंटवर प्रतिक्रिया देत घरमालकाने ” तिथेही तक्रार केली आहे”, असे उत्तर दिले आहे. घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतर घरमालकाने पुन्हा व्हिडीओ पोस्ट करून “चंदिगड प्रशासन आणि @chandigarhpolice यांनी संबंधित व्यक्तीचा स्कूटर नंबर शोधून काढावा आणि संबंधितांवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. सार्वजनिक सुरक्षितता आवश्यक आहे”, अशी कॅप्शन दिली आहे.