Lunch Break kindness Viral Video : भीती आणि आदर यांच्यावर आधारित शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते असते. घरी एक मूल सांभाळणे आपल्याला कठीण जाते आणि शिक्षक २० ते २५ मुलांना न चिडचिड करता, दिवसभर अगदी व्यवस्थित सांभाळतात. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात, तर कधी कधी विद्यार्थीही नकळतपणे शिक्षकांनाच काहीतरी शिकवून जात असतात. असेच काहीसे दृश्य दाखविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थिनीच्या एका छोट्याशा कृतीने शिक्षिका भारावून गेल्या आहेत.
शाळेत दिवसभर मुले काय करतात, इतरांशी कसे वागतात, स्वतःची काळजी कशी घेतात याबद्दल पालकांना कोणतीच कल्पना नसते. पण, आज एका शिक्षिकेने एक सुंदर क्षण तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून विद्यार्थी नेमके कसे वागतात याची झलक दाखवली आहे. वर्गात एका चिमुकलीला डब्यातील भाजी-पोळी खाण्याचा भरपूर कंटाळा आलेला असतो. मग मधल्या सुटीत तिची मैत्रीण तिला भरवण्यास सुरुवात करते. एवढेच नाही, तर अगदी तिच्या तोंडातील घास संपेपर्यंत तिच्याकडे बघत राहून लगेच तिला दुसरा घास भरवते. अनेकदा एखादे लहान मूल जेवायला कंटाळा करते तेव्हा आई त्याला स्वतःच्या हाताने भरवते. हेच लक्षात ठेवून आज या विद्यार्थिनीने तिच्या शाळेतल्या मैत्रिणीला भरवले आहे.
ती इतक्या लहान वयात आई झाली… (Viral Video)
व्हायरल व्हिडीओ शिक्षिकेने शेअर केला. तसेच “जेवणाच्या सुटीत UKG विद्यार्थ्यांपैकी एक नेहाने असे काहीतरी केले, जे मला भरपूर भावले. मधल्या सुट्टीत विद्यार्थिनींमधील एक मुलगी जेवत नव्हती. ती वर्गात सगळ्यात लहान होती. सर्व जण तिला वर्गात ‘पप्पा’ म्हणतात. वेळ झाल्यामुळे तिला जेवायला त्रास होत होता. पण, कोणीही न सांगता, नेहाने तिला भरवायला सुरुवात केली. ही इतकी छोटीशी कृती असली तरीही तिच्यामुळे त्या चिमुकलीचा संपूर्ण दिवस छान गेला. लहान मुले आपल्याला खूप काही शिकवून जातात” ; अशी कॅप्शन शिक्षिकेने व्हिडीओला दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @miss_lalitha_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “काही मुले सहानुभूती घेऊन जन्माला येतात”, “मी शाळेत असताना, साधारण चौथी व पाचवीमध्ये मला जेवणाचा खूप कंटाळा असायचा. शिक्षकांसमोर बसून मला डब्बा खायला लागायचा. मग तेव्हा माझ्यासाठी काही मित्र माझ्या बाकासमोर येऊन मला प्रोत्साहन द्यायचे. एकेक चमचा खा. तू डबा पूर्ण संपवू शकतेस. हा सगळा प्रसंग मला आजही आठवतो आहे”, ” ती इतक्या लहान वयात आई झाली. म्हणूनच लोक म्हणतात की, चिमुकली, तरुणी असो किंवा एखादी महिला या प्रेमाचे, काळजीचे, सहानुभूतीचे प्रतीक असतात”, “शेवटी संस्काराचा विषय” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.