Viral Video Child Creates Lalbaugcha Raja 2025 Idol : ‘लालबागचा राजा’ हा गणपती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी कित्येक जण तासन् तास रांगेत उभे राहून दर्शन घेतात. लहान मुलांपासून ते अगदी आजी-आजोबांपर्यंत सगळेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी उत्सुक असतात. मंडळाचे सदस्य, सुरक्षेसाठी पोलिस आणि भाविक इतकी सगळी मंडळी राजाच्या दरबारात असणार म्हटल्यावर गर्दी ही होणारच. त्यामुळे अनेकदा इथे चेंगराचेंगेरी, धक्काबुक्की होते आणि व्हीआयपी दर्शन सुविधा दिली जात असल्यामुळे तासन् तास रांगेत उभ्या राहणाऱ्या इतर भाविकांची चिडचिडसुद्धा होते. पण, आज एका अनोख्या, मनाने श्रीमंत अशा मंडळाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्हीही भारावून जाल.
@priyanshu_4023_ या इन्स्टाग्राम युजरन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका चिमुकल्याने लालबागच्या राजाचा मंडप तयार केला आहे. एका कागदावर ‘लालबागचा राजा दर्शन! गणेशोत्सव २०२५. वेळ ७ ते ८’ असं मोठ्या अक्षरात लिहिण्यात आले आहे. त्यानंतर हळूहळू व्हिडीओ काढणारी अज्ञात व्यक्ती मंडपाच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाते आणि चिमुकल्यानं मातीपासून किंवा क्लेपासून बनवलेल्या ‘लालबागच्या राजा’चे दर्शन होते. पडदा लावून, झाडांच्या फुलांनी सजावट करून आणि काही फुलं लालबागच्या राजाच्या चरणी वाहून सुंदर अशी सजावट चिमुकल्याने केल्याचे दिसते आहे.
मूर्ती कितीही असू द्यात…खरा देव तर इथे बसला आहे… (Viral Video)
शेवटी मनात चांगल्या भावना असल्या की, देवसुद्धा सांभाळून घेतो, असे म्हणतात. या चिमुकल्याने लालबागच्या राजाचा मंडप त्याच्या कौशल्याने आणि निरीक्षणाने बांधला आहे. इथे दर्शन घेण्यासाठी कोणतीही गर्दी किंवा धक्काबुकीसुद्धा होणार नाही आणि तुम्ही इथे तुम्हाला पाहिजे तितका वेळ थांबू शकता आणि राजाचे डोळे भरून दर्शन घेऊ शकता. चिमुकल्याने मनापासून बनवलेल्या लालबागच्या राजाचा मंडप एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @priyanshu_4023_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “मूर्ती कितीही असू द्यात… खरा देव तर इथे बसला आहे”, “हा खरा लालबागचा राजा”, “सगळ्यात श्रीमंत मंडळ”, “जगातलं सगळ्यात श्रीमंत आणि दिलदार मंडळ”, “इथे व्हीआयपी दर्शन दिले जात नाही, येथे येणारे सगळेच व्हीआयपी असतात”, “सगळ्यात श्रीमंत मंडळ ना इथे कोणाला ना व्हीआयपी दर्शन ना कोणाला धकाबुक्की”, “जिथे श्रद्धा तिथेच देव; मग ती झोपडी का असेना” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.