स्पेनमधील अ‍ॅड्येल्यूसिया येथील संसदेच्या इमारतीमध्ये बुधवारी एकच गोंधळ उडाला. संसदेच्या मुख्य सभागृहामध्ये एक उंदीर शिरल्याने मंत्र्यांची चांगलीच तारांबळ उडाली. एका महत्वाच्या विषयावर मतदान सुरु असतानाच हा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं. संसदेतील कॅमेरांमध्ये कैद झालेला या प्रसंगांचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालाय. उंदीर पहिल्यानंतर सभागृहाच्या महिला सभापती आश्चर्याने तोंडावर हात ठेवून समोरच्या घडामोडींकडे पाहतानाचे दृष्यही या व्हिडीओत दिसत आहे. समोर संसदेच्या सभागृहामध्ये उंदीर दिसताच महिला नेत्यांबरोबरच पुरुष नेत्यांचीही धावपळ सुरु होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी १३ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार अ‍ॅड्येल्यूसियन संसदेचं कामकाज या गोंधळामुळे काही काळ थांबवण्यात आलं. सुझॅना डियाझ यांच्या निवडीसंदर्भातील मतदान सुरु होण्याच्या आधीच एका महिला मंत्र्याला हा उंदीर दिसला आणि ती थेट संसदेच्या सभागृहाबाहेर पळून गेली.

नक्की पाहा हे फोटो >> Photos : …अन् अर्धा तास ती मांजर घराच्या दारात कोब्रासमोर बसून राहिली

रिजनल स्पीकर मार्टा बॉस्क्युट या संसदेमधील सभासदांना संबोधित करत असताना मध्येच थांबल्या. त्यांना समोरचं दृष्य पाहून एवढं आश्चर्य वाटलं की त्या थोड्या किंचाळल्या आणि त्यांनी तोंडावर हात ठेवला. त्यानंतर कॅमेरा संसदेच्या सभागृहाकडे पॅन होतो तर एक महिला पळत संसदेच्या सभागृहाबाहेर निघून जाताना दिसते. इतर नेतेही आपल्या जागेवरुन उठून उंदीर कुठे आहे हे शोधण्यासाठी आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी धावपळ करु लागतात. जवळजवळ सर्वच सदस्य आपल्या आसनांवरुन उठून उंदराचा शोध घेताना किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी पळताना दिसतात.

एबीसी अ‍ॅड्येल्यूसियाने दिलेल्या वृत्तानुसार या उंदरामुळे संसदेचं कामकाज बंद पडलं. अनेक खासदार या उंदराला एका कोन्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर जुआन मरीन यांनी या उंदराला पायाने सभागृहाच्या बाहेर ढकललं आणि इतर सर्व खासदारांनी टाळ्या वाजवून आणि हसत आनंद साजरा केला. उंदराला बाहेर काढल्यानंतर सर्वजण पुन्हा ज्या विषयावर मतदान सुरु होते त्यासंदर्भात चर्चा करु लागले. मतदानानंतर सुझॅना डियाझ यांना खासदार म्हणून सदस्यत्व देण्याच्या बाजूने निर्णय झाला.

नक्की वाचा >> जर्मनी : भारतीय महिलेने सादर केलेल्या करोना व्हॅक्सिन सर्टीफिकेटवरील मोदींचा फोटो पाहून अधिकारी संतापली अन्…

सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी मजेदार कमेंट्सही दिल्या आहेत. हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांना देशातील सर्वोच्च सदनामध्ये उंदीर शिरल्याबद्दल आश्चर्य वाटलं आहे तर काहींनी मंत्री सुद्धा उंदरांना घाबरतात हे पाहून थोडं हसू आल्याच्या प्रतिक्रिया दिल्यात. एक उंदराने संपूर्ण संसद हलवून टाकली, उंदरामुळे मंत्र्यांची भांबेरी उडाली अशाही कमेंट काहींनी केल्या आहेत.

एकीकडे या उंदरामुळे मंत्र्यांचा गोंधळ उडाल्याचं दिसलं तर दुसरीकडे आता या व्हिडीओवर लोक मजेदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch politicians scramble to their feet as rat enters parliament in spain scsg
First published on: 22-07-2021 at 14:43 IST