तुमच्यात जिद्द असेल तर कोणत्याही वयात तुम्ही एखादी गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने करु शकता. जिद्द तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून अडवू शकत नाही. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये एक आजी टेबल टेनिस अतिशय उत्तम पद्धतीने खेळताना दिसते आहे. त्यांचे हे एकाहून एक अफलातून फटके पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. अतिशय शिताफीने त्या हा खेळ खेळताना दिसत आहेत, तेही साडी नेसून. खेळाडूही आपले ठराविक वय पार केले की खेळातून निवृत्त होतात. मात्र य़ा आजींचा खेळातील उत्साह पाहून त्यांच्यातील तारुण्य तुम्हाला लाजवल्याशिवाय राहणार नाही.
आजीबाईंचा हा व्हिडिओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पांढरे केस असलेल्या आणि चष्मा घातलेल्या या आजी पदर खोचून खेळताना पाहून त्या इतकी दमदार खेळी कशी करतात, असा प्रश्नच आपल्याला पडतो. पण त्या खेळत असलेले शॉटस आपण नकळत पाहतच राहतो. स्पर्धकाने दिलेला चेंडू या आजी अतिशय चांगल्या पद्धतीने परतवून लावत असल्याचे दिसते. तुमचे वय हे केवळ नावापुरते असते आणि तुम्ही मनाने तरुण असाल तर तुम्ही कोणतीही गोष्ट अगदी सहज करु शकता, हेच या आजींच्या खेळातून आपल्याला दिसते आहे.