Unique Home For Sell: लग्न पाहावे करून आणि घर बघावे बांधून… असं म्हणतात. कारण या दोन्ही गोष्टींचा पाया मजबूत करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आवश्यकता असते. पण अलीकडे घर बांधून तर सोडा भाड्यावर घेणं सुद्धा खिशाला मोठं भगदाड पाडण्याचं निमित्त झालं आहे. मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रोपोलिटियन शहरांमध्ये तुम्हाला उभं राहायला चौरसभर जागेसाठी सुद्धा हजारो रुपये खर्च करावे लागतात. घरांच्या किमती जशा वाढत आहे तसेच दुसरीकडे घरांचे आकार मात्र कमी होत आहेत. तुम्ही आजवर अनेकदा सोशल मीडियावर “अरे हे तर सुरु होताच संपलं” असं बोलायला भाग पाडायला लावणारे घरांचे व्हिडीओ पाहिले असतील. असाच काहीसा प्रकार आता नव्याने व्हायरल होत आहे.

दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागातून एका तरुणाने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका घराचा फोटो शेअर केला आहे. या घराची अवस्था पाहून धक्का बसलेले नेटकरी पूर्ण गोंधळून गेले आहेत. यापेक्षा तर तुरुंगात राहणाऱ्या गुन्हेगारांची चांगली सोय केली जाते असेही काही जण म्हणत आहेत. नेमकं हे घर आहे तरी कसं बघूया…

तुम्ही बघू शकता की, यामध्ये एक बेड, एक एसी, एक टेबल फॅन आणि पडदे आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की वाह्ह एसी पासून चांगली सोय केलीये तरीही नाव ठेवण्याचं कारण काय? तर लगेचच समोर तुम्हाला अगदी लॅव्हिश हॉटेलमध्ये असल्याचा भास देणारे एक बाथरूम दिसेल. काचेचा दरवाजा असणाऱ्या या बाथरूममध्ये शॉवरची सोय केलेली आहे आणि त्याच्या बाहेर अगदी बाजूलाच टॉयलेटचा कमोड लावलेला आहे. हॉलमध्ये टॉयलेट बघून नेटकऱ्यांनी तर डोकंच धरलं आहे. तरुणाने हा फोटो शेअर करून या घरासाठी तुम्ही किती भाडं द्याल असा प्रश्न सुद्धा केला आहे.

हे ही वाचा<< जुगाडू काकांनी पावसाळ्यात शोधली श्रीमंत व्हायची युक्ती! ग्राहकांनीही घेतलं डोक्यावर, पण मग टीका का होतेय?

आश्चर्य म्हणजे बहुसंख्य युजर्सनी यावर कमेंट करून अरेरेचा सूर लावला असला तरी काही असेही लोक आहेत ज्यांनी या जागेचं कौतुक केलं आहे. आई- वडिलांच्या जीवावर जगण्यापेक्षा किंवा हॉस्टेल/पीजीमध्ये विनाकारण गुलामीत राहण्यापेक्षा असं एखादं घर आम्हीही विकत घेऊ आणि छान पडदे घेऊन त्याला सजवू असा आशावाद काहींनी यावर व्यक्त केला आहे. तुम्हाला काय वाटतं?