Colonel Sofia Qureshi: भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चोख उत्तर पाकिस्तानला दिले. ६ मेच्या रात्री पाकिस्तानच्या पीओजेकेवरील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त करण्यात आले. साधारण २५ मिनिटांत भारतीय लष्कराने ही कारवाई केली असल्याची माहिती लष्कराच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. ७ मे रोजी भारतीय लष्कराने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनबाबत माहिती दिली. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन महिला अधिकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या या कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली होती. तेव्हापासून प्रत्येक जण या दोन्ही महिला अधिकारी नक्की कोण आहेत, त्यांचे शिक्षण कुठे झाले यांसारख्या अनेक गोष्टींबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या गूगल ट्रेंडवर सोफिया कुरेशी हा कीवर्ड खूप सर्च होत आहे.
कोण आहेत सोफिया कुरेशी?
कर्नल सोफिया यांचा जन्म १९८९ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA)मध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या. २०१६ मध्ये त्यांनी पुण्यात झालेल्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स १८ मध्ये भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व केले. पूर्व-उत्तर भारतातील पुराच्या मदतकार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल कर्नल सोफिया यांना ऑफिसर-इन-चीफ हे प्रशंसापत्र मिळाले. कर्नल सोफिया कुरेशी या एका लष्करी कुटुंबातील आहेत. त्यांचे आजोबादेखील सैन्यात होते. कर्नल सोफिया यांचे पती मॅकेनाइन्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत.
कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती?
भारतीय सैन्यात कर्नल ह पद हे वेतन स्तर १३ अंतर्गत येते. अशा परिस्थितीत मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचा मूळ पगार दरमहा १,३०,६०० ते २,१५,१०० रुपयांदरम्यान आहे. त्यांना दरमहा १५,५०० रुपये लष्करी सेवा वेतन (MSP) मूळ पगाराच्या अंदाजे ४६% महागाई भत्ता आणि इतर भत्ते ज्यात सरकारी घरे, वाहने आरोग्य सेवा आणि निवृत्ती भत्तादेखील मिळतो. अशा परिस्थितीत कर्नल सोफियाचा मासिक पगार सुमारे १.८ लाख ते २.५ लाख रुपये असू शकतो, असा अंदाज आहे.

दरम्यान, गूगलवर सोफिया कुरेशी हा कीवर्ड मागील तीन दिवसात दोन लाखांहून अधिक वेळा सर्च झालेला आहे.