Viral facebook post: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. कोणतीही गोष्ट पसरायला सोशल मीडियावर वेळ लागत नाही अगदी वाऱ्यासारखी एखादी गोष्ट इकडे पसरते. कधी कधी याचा फायदा होतो तर कधी कधी याने मोठ नुकसान होतं.असाच प्रकार सध्या पाहायला मिळतोय. सध्या फेसबुकवर एक खास प्रकारची पोस्ट प्रत्येकाच्या वॉलवर दिसत आहे, जी गोपनीयतेशी संबंधित आहे. या पोस्टमध्ये लोक फेसबुकला त्यांचे फोटो किंवा वैयक्तिक माहिती वापरण्यास परवानगी नसल्याचे सांगत आहेत आणि इतरांना हा संदेश कॉपी-पेस्ट करून शेअर करण्यास सांगत आहेत. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा आहे की, जर तुम्ही असे केले नाही तर फेसबुकला तुमची माहिती वापरण्याचा कायदेशीर अधिकार मिळेल. पण यामध्ये किती तथ्य आहे? हे खरंच धोकादायक आहे का? हे जाणून घेऊयात.

नेमकं काय व्हायरल होतंय?

मी XYZ… असे स्पष्ट करतो की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही. उद्या एक महत्त्वाचा दिवस आहे ज्यावर रात्री 9.20 वाजता अधिकृत सिक्का मोर्तब करण्यात आले आहे आणि ही बातमी टीव्हीवर प्रसारित करण्यात आली आहे. फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात. ही वेळ मर्यादा आज संपत आहे. मी माझ्या वैयक्तिक माहिती आणि फोटोच्या वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही.

अशी फेसबुक पोस्ट नवीन नाही. अशा पोस्ट २०२४ आणि २०२५ च्या सुरुवातीला देखील व्हायरल झाल्या. फरक एवढाच की यावेळी तो हिंदी, मराठीसह सर्व स्थानिक भाषांमध्ये भारतभर पसरत आहे. फेसबुक किंवा मेटाने असा कोणताही नियम जाहीर केलेला नाहीय. ज्यामुळे तुमच्या माहितीचा वापर होईल. ही पोस्ट पूर्णपणे अफवा आहे.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….

सध्याच्या या आधुनिक जगात सर्व काही ऑनलाइन झाले आहे. अनेक जण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे या सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांना अनेक नवनवीन मित्रसुद्धा भेटतात. फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटसारख्या सोशल साइटवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. आज आपण त्याचविषयी सविस्तर जाणून घेऊ.

ऑनलाइन मैत्री करताना या गोष्टीचे भान ठेवा की, नेहमी आपल्या मित्रांना सोडून ऑनलाइन मित्रांबरोबर चॅटिंग करणे किंवा त्यांची वाट पाहत सतत स्वत: ऑनलाइन राहणे हे खूप चुकीचे आहे. अशा वेळी तुम्ही फक्त तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत असता.

ऑनलाइन मैत्री सावधगिरीने करा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर करू नका. अनेकदा यातूनच ऑनलाइन स्कॅम घडून येतात.

फेसबुक, इन्स्टाग्रामवर एखाद्याला चांगले ओळखत नसाल, तर त्यांच्याशी व्हिडीओ कॉल किंवा कॉलवर बोलणे टाळा किंवा चुकूनही तुमचे फोटो त्यांच्याबरोबर शेअर करू नका. अनेकदा समोरची व्यक्ती फसवणूक करणारी किंवा हॅकर असू शकते; जी तुमचा जास्तीत जास्त डेटा गोळा करून, त्याचा चुकीचा वापर करू शकते.

ऑनलाइन मैत्री करताना नेहमी सावध राहा. एखादा ऑनलाइन मित्र अडचणीत असल्याचे भासवत तुमच्याकडून पैसे लुबाडू शकतो. त्यामुळे ऑनलाइन मैत्री करताना आर्थिक व्यव्हार करणे शक्यतो टाळावे.