Virat Kohli in IND vs PAK Nana Patekar : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रविवारी (२३ मार्च) खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून मात केली. या विजयासह भारताने २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आणि यंदाच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. दुसऱ्या बाजूला भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने त्यांचं चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तानविरूद्ध शतक झळकावलं आणि भारताचा विजय निश्चित केला. विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला. यासह त्याने स्वत:चं ५१ वं एकदिवसीय शतकही पूर्ण केलं.

दरम्यान, विराटचं शतक व भारताच्या विजयासह समाजमाध्यमांवर आणखी एका व्यक्तीची चर्चा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांचं नाव सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की या सगळ्याचा नाना पाटेकरांशी काय संबंध? फेसबूक, इन्स्टाग्राम व एक्ससह इतर समामाध्यमांवर नाना पाटेकरांचे मिम्स व्हायरल का होतायत? प्रामुख्याने नाना पाटेकरांचे जेवतानाचे फोटो व व्हिडीओ पाहायला मिळत आहेत.

नाना पाटेकर – विराट कोहली कनेक्शन?

नाना पाटेकरांचं क्रिकेटप्रेम सर्वश्रूत आहे. ते सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर या दोन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे चाहते आहेत. तसेच त्यांना विराट कोहलीची फलंदाजी पाहायला आवडते. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की विराट कोहली लवकर बाद झाला तर ते जेवत नाहीत. ते म्हणाले होते की विराट लवकर बाद झाला तर जेवण्याची इच्छाच होत नाही. दरम्यान, रविवारी पाकिस्ताविरुद्धच्या सामन्याद्वारे विराट फॉर्ममध्ये परतला. तसेच त्याने नाबाद शतकी खेळी केली. त्यामुळे समाजमाध्यमांवर लोक म्हणू लागले की “आज नाना पाटेकर पोटभर जेवतील”. या आशयाचे मिम्स समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. नाना पाटेकर यांच्या ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटात त्यांचे जेवतानाचे अनेक प्रसंग आहेत. त्याचे काही व्हिडीओ समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या गंमतीदार कॅप्शनसह व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पाटेकर यांचा वनवास हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान, त्यांनी विराट कोहलीबाबत त्यांचं मत व्यक्त केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. नाना आता आगमी ‘हाऊसफुल ५’ व ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.