ISRO Gaganyaan Mission: इस्रोच्या आगामी महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ दौऱ्यादरम्यान मोठी घोषणा केली. या मोहिमेच्या माध्यमातून इस्रो भारतीय अंतराळवीरांना पहिल्यांदाच स्वबळावर अंतराळात पाठविणार आहे. गगनयान मोहिमेसाठी इस्रोने ‘GSLV Mk3’ या प्रक्षेपक रॉकेटची निवड केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मोहिमेत सहभागी होणाऱ्या चार अंतराळवीरांची नावे जाहीर करीत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी चारही अंतराळवीरांना एस्ट्रोनॉट्स विंग्स देत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यातच भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेच्या घोषणेने फार आनंद झाला आहे, त्यांनी या मोहिमेचे कौतुक करीत अंतराळवीरांना शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद महिंद्रांनी एक्सवर या संदर्भात एक पोस्ट केली आहे.

आनंद महिंद्रांनी नेमकं काय ट्विट केलं आहे?

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी इस्रोच्या ‘गगनयान’ मोहिमेतील स्पेस सूटमधील चार अंतराळवीरांचा फोटो शेअर करीत लिहिले की, भारताने अंतराळातील गगनयान मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांची घोषणा केली. मी फक्त अमेरिका, रशियाच्या अंतराळवीरांचे फोटो पाहून मोठा झालो, ते प्रत्येक जण प्रेरणादायी होते; पण मी उत्सुकतेने कल्पना करायचो, विचार करायचो की,भारतीयांना त्या साहसी स्पेस सूट्समध्ये भारतीय बनावटीच्या स्पेसशिपमधून जाताना कधी आणि केव्हा पाहायला मिळेल? ती इच्छा आता वास्तवात बदलताना दिसतेय. मला आशा आहे की, हे भारतातील संपूर्ण नव्या पिढीच्या कल्पनाशक्ती आणि आकांक्षांना चालना देणार ठरेल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केरळच्या तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये गगनयान मोहिमेत सहभागी होणार्या चार अंतराळवीरांची नावे घोषित केली, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप व विंग कमांडर शुभांशू शुक्ला अशी त्या चौघांची नावे आहेत.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, अंतराळ क्षेत्रातील भारताचे यश तरुण पिढीमध्ये केवळ वैज्ञानिक प्रगतीची बीजे पेरत नाही, तर विविध क्षेत्रांत लक्षणीय प्रगती करीत भारताला २१ व्या शतकात एक गतिशील जागतिक खेळाडू म्हणून उदयास येण्यास मदत करीत आहे.