उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे राजनगर एक्स्टेंशनमध्ये एक पाळीव कुत्र्याने लिफ्टमधील एक लहान मुलाला चावा घेतला. विशेष म्हणजे हा कुत्रा ज्या महिलेचा होता ती यावेळी शांतपणे बघत उभी होती. संबंधित घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. यानंतर मुलाच्या वडिलांनी या महिलेला जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला.
सोमवारी ५ सप्टेंबर रोजी लिफ्टमधून जात असताना महिलेच्या कुत्र्याने मुलाच्या मांडीवर चावा घेतला. जेव्हा ती महिला तिच्या पाळीव कुत्र्याला पट्टा लावून लिफ्टमध्ये गेली तेव्हा मुलगा आधीच तिथे उपस्थित होता. हे मूल लिफ्टच्या दाराजवळ जाताच कुत्र्याने उडी मारली आणि त्याच्या पायावर चावा घेतला. यावेळी या मुलाला प्रचंड वेदना होत होत्या, मात्र तरीही तिथे उभ्या असलेल्या महिलेने मुलाला कोणतीही मदत केली नाही. ती फक्त त्याच्याकडे बघत राहिली.
दरम्यान, गाझियाबाद पोलिसांनी या घटनेची गंभीर दाखल घेत संबंधित महिलेवर कारवाई केली आहे. पालकांच्या तक्रारीवरून त्यांनी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र जडेजाच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; जाणून घ्या कधीपर्यंत होणार मैदानावर पुनरागमन
या हल्ल्यानंतर ही महिला आपल्या कुत्र्याला इमारतींच्या बेसमेंटमध्ये फिरवत असल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे. यावेळी मुलाचे वडील आणि महिला एकमेकांशी वाद घालताना दिसले. ही महिला आपली चूक मान्य करण्यास किंवा तिचा फ्लॅट नंबर उघड करण्यास नकार देत असल्याचे मुलाच्या वडिलांनी म्हटलंय.