टॅटूकडे एक फॅशन स्टेटमेंट म्हणून पाहिले जाते. आज कॉलेजला जाणाऱ्या तरुण- तरुणींपासून ते वयस्कर लोकांनाही अंगावर टॅटू काढून घेण्याची आवडत असल्याचे पाहायला मिळते. शरीरावरील टॅटू अनेकांचे लक्ष वेधून घेतात. यात काही लोक शो ऑफसाठी तर काही एखाद्याची आठवण म्हणून शरीरावर टॅटू काढून घेतात. पण टॅटूमुळे एका ब्रिटीश महिलेचे संपूर्ण करियर खराब झाले आहे. या महिलेने आपल्या शरीरारवर एक – दोन नव्हे तर तब्बल ८०० टॅटू काढले आहेत. पण यामुळे तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोकरी मिळत नसल्याने आता तिच्यावर टॉयलेट साफ करण्याची वेळ आली आहे. कारण अनेक कंपन्या टॅटू लूकला प्रोफेशनल मानत नसल्याने तिला नोकरी देण्यास नकार देत आहेत.

द न्यूयॉर्क पोस्टनुसार, युनायटेड किंगडममधील वेल्समधील ४६ वर्षीय मेलिसा स्लोअनने यापूर्वी टॉयलेट क्लिनर म्हणून काम केले होते, परंतु चेहऱ्यावर आणि शरीरावर टॅटू काढल्यानंतर तिला काम मिळणे अवघड झाले आहे, असे तिचे म्हणणे आहे. तिने कपाळापासून ते पायापर्यंत अनेक टॅटू काढले आहे.

स्लोअनने डेली स्टारला सांगितले की, मला आता नोकरी मिळू शकत नाही. मी जिथे राहतो तिथे शौचालय साफ करण्याच्या कामासाठी अप्लाय केले, पण माझ्या शरीरावरील टॅटूमुळे मला नोकरी मिळत नाही. स्लोअनला दोन मुलं आहेत.

स्लोअन पुढे म्हणाली की, माझ्या संपूर्ण आयुष्यात आता मला कधीच नोकरी मिळणार नाही, असे लोक म्हणतात. एक नोकरी मला मिळाली होती पण तीही फार काळ टिकली नाही. उद्या जर कोणी मला नोकरीची ऑफर दिली तर मी जाऊन काम करेन, मी ऑफर स्वीकारेन.

स्लोअनने वयाच्या २० व्या वर्षी पहिल्यांदा टॅटू काढला त्यानंतर तिला टॅटू काढण्याचे व्यसनचं जडले. काम मिळण्यास अडचणी असतानाही मेलिसा स्वतःला ती ‘व्यसनी’ म्हणवून घेते. दर आठवड्याला ती अंगावर तीन नवीन टॅटू काढते.

स्लोअनला चेहऱ्यावर टॅटू काढून घेण्याची विशेष आवड आहे. यामुळे आता तिच्या चेहऱ्यावर टॅटू न काढलेली थोडीही मोकळी जागा शिल्लक नाही. तिने तीनवेळा जुन्या टॅटूवर पुन्हा गोंदवले आहे, ज्यामुळे तिचा चेहरा एक मोठा कोलाज बनला आहे.

स्लोअन सांगते की, माझ्या चेहऱ्यावर टॅटूचे तीन थर आहेत. यामुळे भविष्यात कदाचित जगातील सर्वात जास्त टॅटू हे माझ्या शरीरावर असतील, जर नाही, तर ते मी करण्याचा प्रयत्न करेन. यामुळे शेवटी जगातील सर्वात जास्त टॅटू माझ्या शरीरावर असतील.