भारताची ग्रँडमास्टर आर. वैशालीने ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या महिला गटाचे विजेतेपद राखण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ही स्पर्धा सलग दोन वेळा जिंकणारी ती पहिली बुद्धिबळपटू ठरली. या कामगिरीसह तिने प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. सोमवारी झालेल्या अखेरच्या ११व्या फेरीअंती वैशाली आणि कॅटेरिना लायनो यांचे समान आठ गुण होते. मात्र, सरस ‘टायब्रेक’ गुणफरकामुळे वैशालीने विजेतेपद राखले. २२ वर्षीय ग्रँडमास्टर वैषालीने शेवटच्या फेरीत चीनच्या माजी जागतिक विजेत्या झोंगी टॅन हिच्याशी बरोबरी साधत हे यश मिळवले.आर. वैषालीने FIDE Grand Swiss जिंकून इतिहास घडवला, पण या विजयाची खरी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली — जेव्हा तिने आईला स्टेजवर बोलावून ट्रॉफी तिच्या हातून स्वीकारली.

स्पर्धा जिंकल्यानंतर विजेत्या वैषालीने एक हृदयस्पर्शी क्षण निर्माण केला. आपल्या आईला थेट मंचावर बोलावून तिच्या हस्ते विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ChessBase India च्या X हँडलवरून व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, – “किती अभिमानाचा क्षण! दोन वेळा Women’s Grand Swiss विजेती @chessvaishal.”

व्हिडिओ पाहून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. एका युजरने लिहिले, “हा कोणत्याही पालकासाठी अभिमानाचा क्षण आहे. मुलीने देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.” तर दुसऱ्या युजरने प्रतिक्रिया दिली, “दोन वेळा Grand Swiss जिंकणं, Candidates जिंकण्यापेक्षाही कठीण आहे. अप्रतिम कामगिरी!”

तिसऱ्याने एका प्रतिक्रियेत लिहिले की, “हा फक्त आईचा अभिमान नाही, तर भावाचा देखील आहे. प्रगल्भ आपल्या बहिणीच्या यशामुळे किती आनंदी आहे हे दिसून येतंय. भावंडांमध्ये इतका घट्ट बंध फारसा दिसत नाही.”

या स्पर्धेत वैषालीसोबत तिची आई व धाकटा भाऊ ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे वैषालीने सलग दुसऱ्यांदा Grand Swiss किताब पटकावला आहे. याआधी २०१३ मध्ये तिने आयल ऑफ मॅन, युनायटेड किंगडम येथे ही स्पर्धा जिंकली होती.

या वर्षी वैषालीने ११ पैकी ६ सामने जिंकले, १ गमावला तर ४ सामने बरोबरीत सोडले. तिच्या खात्यात एकूण ८ गुण जमा झाले. रशियन ग्रँडमास्टर कॅटेरीना लाग्नो हिलाही तेवढेच गुण मिळाले, परंतु टाय-ब्रेकमध्ये वैषाली वरचढ ठरली.

यानुसार वैषाली आणि लाग्नो या दोघींनी Candidates Tournament मध्ये अधिकृत पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेसाठी केवळ ८ महिला खेळाडू निवडल्या जातात, त्यामुळे वैषालीचं हे यश तिच्या कारकिर्दीत एक मोठं टप्पं आहे.

दरम्यान, खुल्या गटात नेदरलँड्सच्या ग्रँडमास्टर अनीश गिरीने अमेरिकेच्या हान्स मोक नीमनचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. त्यालाही ८/११ गुण मिळाले. जर्मनीचा मॅथियास ब्ल्यूबॉम हा दुसरा पात्र खेळाडू ठरण्याची शक्यता असून अधिकृत टाय-ब्रेक निकाल अद्याप बाकी आहे.