माणसाच्या मनोरंजनासाठी चीनच्या मॉलमध्ये ठेवलेल्या जगातल्या ‘त्या’ दु:खी अस्वलाला अखेर असे घर मिळणार आहे जिथे तो सुखात राहु शकतो. काही दिवसांपूर्वी चीनच्या एका शॉपिंग मॉलमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी पिंज-यात ध्रुवीय अस्वलाला ठेवले होते. या अस्वलासाठी खास प्रकारचे वातावरण त्या पिंज-यात तयार केले आहे. त्या ध्रुवीय अस्वलाला पाहण्यासाठी हजारो चीनी नागरिक मॉलमध्ये येतात. प्रत्येकाला त्या अस्वलाला आपल्या कॅमेरामध्ये कैद करायचे असते. जो तो त्याचे फोटो काढण्यासाठी धडपडत असतो. पण काही दिवसांपासून हे अस्वल लाख प्रयत्न केले तरी उठायला तयार नाही.

बर्फाच्या लादीवर हातात हाडूक घेऊन हे अस्वल तासन् तास पडून असल्याचा व्हिडिओ अनेकांनी काढला. त्यातल्या एका व्हिडिओमध्ये त्याच्या डोळ्यांत अश्रूही दिसत आहे. त्यामुळे दु:खी झालेल्या या अस्वलाचे फोटो तूफान व्हायरल झाले होते. अन् या अस्वलाला जगातील सगळ्यात दु:खी अस्वल असेच नावच पडले. ‘पिझ्झा ‘ असे या अस्वलाचे नाव. या अस्वलाला कदाचित चांगले घर मिळाले नसल्यामुळे तो दु:खी असेल असा निष्कर्ष सगळ्यांनी काढला होता. त्यामुळे या अस्वलाची दखल घेत अॅनिमल एशिया या प्राणीप्रेमी संघटनेने त्याला नवे घर देऊ केले आहे. या संघटनेने त्याला इंग्लडच्या एका प्राणी संग्रहालयात ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्राणी संग्रहालयात खास ध्रुवीय अस्वलांसाठी वातावरण तयार करण्यात आले आहे त्यामुळे तेथील वातावरणात पिझ्झा चांगला रुळेल असेही अॅनिमल एशियाने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.