Reddit Post: रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध क्षेत्रांत काम करणारे कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या संघर्षांबाबत मोकळेपणाने व्यक्त होत असतात. या व्यक्त होणाऱ्यांमध्ये तरुण कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. अशात, या वर्षी मे महिन्यात कंपनीत रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, काही दिवसांपासून त्याला डोळ्यांचा गंभीर असा कंजंक्टिव्हायटिस (conjunctivitis) हा आजार झाला आहे. या आजारामुळे सुट्टी मागितल्यानंतर बॉस त्याच्याशी कसा वागला, हे त्याने रेडिटवर एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. “बॉसच्या या अमानुषपणासाठी मध्ययुगीन काळात त्यांना कदाचित चाबकाचे फटके मारले असते आणि फाडून टाकले असते”, असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

या कर्मचाऱ्याच्या पोस्टनुसार, त्याला डॉक्टरांनी कामावरून एक आठवडा सुट्टी घेण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर विश्रांतीचा कालावधी स्पष्टपणे नमूद केला होता. पण डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या डोळ्यांतून रक्त येऊ लागल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. यामुळे घाबरलेल्या या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅपवर याबाबतची माहिती आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बॉसला पाठवले. यावर त्याचा बॉस म्हणाला, “एचआरशी बोला. मी तुमच्याशी याबाबत काहीही बोलू शकत नाही. तुम्ही काहीही काम करत नाही.”

या तरुण कर्मचाऱ्याची रेडिट पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेडिट युजर्स यावर मोठ्या संख्येने व्यक्त होत आहेत. अनेकांनी या कर्मचाऱ्याच्या बॉसला निर्दयी ठरवले. अनेकांनी या कर्मचाऱ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आणि असे म्हटले की, तो फक्त डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करत होता. त्याला विश्रांतीची गरज होती. त्याच्याशी असे वागायला नको होते.

एका युजरने या कर्मचाऱ्याच्या पोस्टवर टिप्पणी करत म्हटले की, “भाऊ, पुढच्या वेळी फक्त माहिती दे, फोन एअरप्लेन मोडवर टाक आणि तुझी तब्येत ठीक होईपर्यंत काळजी करू नकोस. हे लोक तेव्हाच समजतील.” तर दुसरा एक युजर म्हणाला की, “हे किती भयानक वर्तन आहे. असे करून ते कसे सुटू शकतात?”