Navratri Garba Dance Viral Video :“नवरात्र म्हटलं की भक्ती, रंग, संगीत आणि गरब्याच्या तालावर थिरकणारे पाय – हीच खरी उत्सवाची ओळख. रात्रीभर चालणाऱ्या या नृत्यात केवळ शरीरच नाही, तर मनही ताल धरतं. गरबा हे केवळ नृत्य नसून, परंपरेशी जोडणारं आणि आनंदाने एकत्र आणणारं बंधन आहे. म्हणूनच, पाऊस असो वा कोणतीही अडचण, गरब्याचं वेड आणि त्यावरील प्रेम थांबत नाही.”

पावसात कधी एखाद्या गाण्याच्या तालावर नाचावंसं वाटलंय? पण नाचताना चिखलात घसरायची भीती, कपडे खराब होण्याची चिंता – हे सगळं आठवलं की आपण मागे हटतो. मात्र, एका गरबा प्रेमीनं हे सगळं विसरून नवरात्रीच्या उत्साहात पावसात असा डान्स करत आहे. त्याचा डान्स पाहून सोशल मीडियावर लोक थक्क झाले.

नवरात्रीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या पावसाने अनेकांची निराशा झाली. नवरात्रीच्या उत्साहात अचानक झालेल्या परतीच्या पावसाने गरबा प्रेमींचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न केला तरीही उत्साही गरबा प्रेमी मात्र थांबले नाहीत. देशभरातल्या अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे मंडप रिकामे झाले, तर काहींना घरीच थांबावं लागलं. अनपेक्षित परतीच्या सरींनी मैदानं चिखलमय केली. पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका व्हिडिओने दाखवून दिलं की पाऊस असो वा चिखल, गरब्याची तालावा कोणीही कुठेही नाचू शकतो.

पावसातही रंगला गरबा! तरुणाचा चिखलातला डान्स व्हिडिओ व्हायरल

या व्हायरल व्हिडिओमध्ये एका तरुण मुसळधार पावसात, मैदानावरील चिखलात उतरून जोशात गरबा स्टाईलमध्ये फिरकी घेताना दिसत आहे. चिखलामुळे जमीन निसरडी झाली आहे, कधीही पाय घसरून तो पडू शकतो पण कशाचीही पर्वा न करता त्याने पारंपरिक ‘गरबा स्टेप्स’ इतक्या सहजतेने सादर केल्या की नेटकरी थक्क झाले.

व्हायरल व्हिडिओनं नेटकऱ्यांची मने जिंकली

सोशल मीडियावर या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. एका युजरने लिहिलं – “अफलातून उर्जा आणि अप्रतिम चिकाटी.” तर दुसऱ्याने मजेशीर कमेंट टाकली – “माझा पंखा बंद पडलाय… काय तू त्याची जागा घेणार आहेस?”

खरं तर, हा डान्स करणारा युवक याआधीही असे अनेक व्हिडिओ पोस्ट करत आला आहे. त्याची नृत्यकला आणि उत्साह पाहून नेटिझन्सनी त्याला ‘गरब्याचा खरा दिवाना’ असं संबोधलं आहे.

याचदरम्यान, गुजरातच्या वडोदऱ्यातल्या प्रसिद्ध युनायटेड वे गरबा मैदानावर वेगळंच प्रकरण चर्चेत आलं. येथे एका NRI जोडप्याचा गरबा दरम्यान किस करणारा व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. भक्ती आणि परंपरेच्या रंगलेल्या रात्रीला असा वादग्रस्त वळण मिळाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.