आपण यूट्युबचा वापर फारफार तर व्हिडिओ, एखादा चित्रपट पाहण्यासाठी करतो. पण तुम्हाला माहिती असेलच की, या माध्यमाचा वापर करून अनेक जण महिन्याला लाखो रुपये देखील कमावू शकतात. लंडनमध्ये राहणारा टॉम एक्स्टोन हा व्लॉगर दर महिन्याला यूट्युबवरून जवळपास ६ लाख ९५ हजारांहून अधिक कमाई करतो. टॉमच्या व्हिडिओ ब्लॉगना लोकांची खूप जास्त पसंती लाभत आहे आणि यामाध्यमातून टॉम दर महिन्याला जास्तीत जास्त पैसे कमावत आहे.

टॉमला गाड्यांची आवड आहे. वेगवेगळ्या गाड्या चालवून या गाड्याचे रिव्ह्यू टॉम लिहितो. सुरुवातीला विविध गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह करून त्यानं रिव्ह्यू लिहायला सुरूवात केली. हे रिव्ह्यू त्याने सोशल मीडियावर अपलोड केले त्यांना लोकांची चांगली पसंती लाभली. आपल्या लिखाणात थोडी कल्पकता वापरून रिव्ह्यूचा व्हिडिओ तयार केला तर लोक अधिक आकर्षित होतील आणि यूट्युबच्या माध्यमातून चार पैसेही कमावता येतील असा विचार करून टॉम व्लॉगर झाला.

सध्या टॉमचे इन्स्टाग्रामवर दीड लाख फॉलोअर्स आहेत तर यूट्युबवर ८० हजारांहून अधिक सबस्क्राइबर आहेत. त्याने आतापर्यंत दिलेल्या गाड्यांचे रिव्ह्यू अगदी तंतोतंत बरोबर असतात, असं त्याच्या फॉलोअर्सचं म्हणणं आहे. त्यामुळे एखादी गाडी खरेदी करायला जाताना त्याचा रिव्ह्यू आवर्जून पाहिला जातो. टॉम यांनी आतापर्यंत लेम्बोर्गिनी, पोर्शे, पगानी, रेंज रोव्हर या कार्सचे रिव्ह्यूही लिहले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.