Cylinder on Raily Track: सोशल मीडियात प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली कटेंट क्रिएटर्स कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. व्हिडीओ आणि रिल्स करण्याच्या नादात अनेक कटेंट क्रिएटर्सना आपला जीव गमवावा लागला आहे. अन्वी कामदार या सनदी लेखापाल तरुणीचं प्रकरण ताजं आहे. आता असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून समोर आले आहे. येथील एका युट्यूबरने प्रसिद्धी मिळविण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर विविध वस्तू ठेवून व्हिडीओ बनविले. या मुलाने गॅस सिलिंडर, जिवंत कोंबडी ट्रॅकवर ठेवली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या युट्यूबरचं नाव गुलझार शेख (वय २४) असून युट्यूबवर पैसे मिळविण्यासाठी त्याने असे अनेक व्हिडीओ तयार केले आहेत. लाल गोपालगंज याठिकाणी त्याने हे अनेक व्हिडीओ चित्रीत केले होते. 'ट्रेन्स ऑफ इंडिया' या एक्स हँडलवर गुलझार शेखचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. हे वाचा >> VIDEO: “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” रीलसाठी तरुणानं उंच इमारतीवरुन मारली उडी; पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का तसेच पोस्टच्य कॅप्शनमध्ये रेल्वेच्या अधिकृत हँडलला टॅग करून आवाहन करण्यात आले आहे. "या माणसाचे नावे गुलझार शेख असून तो उत्तर प्रदेशच्या गोपालगंज येतील आहे. तो युट्यूबवर पैसे मिळविण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर कोणत्याही वस्तू ठेवतो. यामुळे रेल्वेत बसलेल्या हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. त्यामुळे या युट्यूबवर कडक कारवाई करावी", अशी मागणी या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली. ट्रेन्स ऑफ इंडियाच्या या पोस्टनंतर रेल्वे सुरक्षा दलाने गुलझार शेखला उत्तर प्रदेशच्या खंडौली गावातून अटक केली. त्याची सध्या चौकशी सुरू असून त्याला लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे कायद्यातील कलम १४७, १४५, १५३ नुसार गुलझारवर गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा >> रायगडमध्ये माजी सैनिकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण; कारण ऐकून अवाक् व्हाल; थरारक VIDEO व्हायरल डीआरएम लखनौ यांनीही एक्सवर पोस्ट टाकत या प्रकरणाची दखल घेतली. "सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आरोप रेल्वे ट्रॅखवर विविध वस्तू ठेवताना दिसत आहे. त्याचे नाव गुलझार शेख असून आरपीएफने त्याला अटक केली आहे. सध्या त्याच्यावर खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे." भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनीही गुलझार शेखने तयार केलेल्या व्हिडीओंवर आक्षेप घेतला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी गुलझार शेखवर कडक कारवाई करावी. गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे रेल्वे अपघात झाले, त्यादृष्टीने हे व्हिडीओ धोकादायक आहेत, असेही ते म्हणाले. "रेल्वे अपघातांना कारणीभूत ठरणारे घटक राष्ट्रद्रोही आहेत. रेल्वेच्या सिग्नलमध्ये अडथळा निर्माण करणे, ट्रॅक्सवर काही वस्तू टाकणे, अशा अनेक घटना घडल्या आहेत. गुलझार शेखकडेच पाहा, त्याने ट्रॅकवर सायकल, सिलिंडर, दगड आणि इतर अनेक वस्तू मांडल्या होत्या. त्याच्या या मस्तीमुळे किती रेल्वे अपघात झाले, हे देवालाच माहीत." आरोपी गुलझार शेखच्या युट्यूब चॅनेलचे नाव गुलझार इंडिया हॅकर असे असून त्याच्या चॅनेलवर २४३ व्हिडीओ आहेत. या व्हिडीओजना एकूण १५ दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून त्याच्याकडे २ लाख ३५ हजार सबस्क्राइबर आहेत.