पोलीस अधिकारी आमदार, खासदारांना सॅल्यूट मारताना आपण नेहमीच पाहत असतो. पण एखादा खासदार पोलीस अधिकाऱ्याला सॅल्यूट मारताना कधी पाहिलं नसेल. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे ज्यामध्ये खासदार पोलीस अधिकाऱ्याला कडक सॅल्यूट ठोकताना दिसत आहे. आता खासदाराने एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला सॅल्यूट ठोकणं प्रोटोकॉल आहे की नाही यावरुन चर्चा सुरु आहे. पण हा फोटो जितका उत्कंठा वाढवणारा आहे तितकीच त्यामागची गोष्टही रंजक आहे.
फोटोत सॅल्यूट ठोकताना जे दिसत आहेत त्यांचं नाव गोरंतला माधव असून ते माजी पोलीस अधिकारी आहेत. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यामधील कादिरी येथून निवडणूक जिंकत नुकतेच ते खासदार झाले आहेत. माधव यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवत तेलुगू देसम पक्षाच्या क्रिस्ताप्पा निम्मला या विद्यमान खासदाराचा १ लाख ४० हजार ७४८ मतांनी पराभव केला.
मतदान केंद्रावर मतमोजणी सुरु असताना गोरंतला माधव तिथे उपस्थित होते. यावेळी डीएसपी मेहबूब बशा यांना पाहून त्यांनी आदर व्यक्त करत सॅल्यूट ठोकला.
जेव्हा माधव यांना सॅल्यूट का केला असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘मी आधी डीएसपींना सॅल्यूट केला, नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. हा आमचा एकमेकांप्रती आदर आहे’. महत्त्वाचं म्हणजे टीडीपी नेते आणि अनंतपूरमधील माजी खासदार जेसी दिवाकर रेड्डी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर माधव यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. रेड्डी यांनी पोलिसांप्रती वापरलेल्या आक्षेपार्ह शब्द वापरले होते.