25 May 2020

News Flash

उजळावया आलो वाटा..

संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही.

तुक्याचे अभंगातील खरा अर्थ टाळून काही मंडळी तुकारामांना भेटतात. याचा अर्थ उघड आहे- त्यात मोठा घोटाळा आहे. तो नेमका काय आहे, हे जाणून घेत असताना तुकारामांच्या अभंगांतील अर्थाला आजच्या काळाच्या संदर्भात भिडण्याचा प्रयत्न म्हणजे हे पाक्षिक सदर..
संतांच्या अनेक खुणा अनेकांनी सांगितल्या आहेत. पण त्यातील एक खूण मात्र नीट ध्यानी घेतली जात नाही. ती म्हणजे बंडखोरी! संत सारेच बंडखोर असतात. असावयास हवेत. तुकाराम तसे होते. खरे तर ते म्हणजे बंडखोरांतले बंडखोर. प्रस्थापितांच्या विरोधात तुकाराम नेहमीच उभे राहिल्याचे दिसतात. ही अर्थातच त्यांच्या ‘विष्णुपंत पागनिसी’ रूपडय़ाच्या विरोधातील प्रतिमा आहे. पण गाथेतून उभे राहणारे तुकाराम असेच आहेत. नाठाळपणा कराल तर डोक्यात काठी घालणारे. कोणाचीही भीडभाड न बाळगणारे. धट. फटकळ. बरे पुन्हा ‘अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड। काय त्यासी रांड प्रसवली।।’ असे सतराव्या शतकात ते म्हणत आहेत. तेव्हा हा नुसता फटकळपणा नसतो, तर त्यामागे प्रचंड हिंमत असते. नैतिक ताकद असते. तुकारामांचे चरित्र आणि विचार समजून घेताना त्यामागील ही नैतिकत ताकद विसरता येणार नाही.
तुकोबांच्या संपूर्ण विचारांमागे एक सूत्र आहे. त्याची एक कडी इतिहासात जोडलेली आहे आणि दुसरी तेव्हाच्या व्यवस्थेत. या इतिहासाला प्रारंभ होतो तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात. हा महाराष्ट्रातील संत-चळवळीच्या प्रारंभीचा काळ. या काळात महाराष्ट्रात यादवांची सत्ता होती. राजा रामदेवराय राज्य करीत होता. हा मोठा कर्ता पुरुष. थेट काशीपर्यंत जाऊन ते तीर्थ जिंकणारा. वैदिक धर्माभिमानी. आपल्या देशीकार लेण्यात ज्ञानदेवांनी त्याचा- ‘तेथ यदुवंशविलासु। जो सकळकळानिवासु। न्यायातें पोषी क्षितीशु। श्रीरामचंद्रु।।’ असा उल्लेख केला आहे. हेमाद्रीपंडित त्याचा मंत्री. ‘चतुर्वर्गचिंतामणी’ हा त्याचाच ग्रंथ. त्याच्या व्रतखंडात सुमारे दोन हजार व्रतांची आवश्यकता प्रतिपादन केली आहे. आता एवढी व्रतवैकल्ये करणारा समाज केवढा सुखसंपन्न असणार! रामदेवरायाच्या संपन्नतेची कल्पना फेरिस्ता या बखरकाराने केलेल्या एका उल्लेखातून येते. १२९४ ला अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून ‘६०० मण मोती, २०० मण हिरे-माणके-पाचू वगैरे, एक हजार मण चांदी, चार हजार रेशमी तागे.. याशिवाय अगणित मौल्यवान वस्तू’ खंडणीस्वरूपात नेल्या असे फेरिस्ताने लिहून ठेवले आहे. पण हे वरवरचे चित्र आहे. अगदी आजच्यासारखेच. त्यातून सत्ताधाऱ्यांचे वैभव दिसते. सर्वसामान्यांची अवस्था मात्र तेव्हाही वाईट होती. ‘ज्ञानेश्वरी’ हा काही समाजशास्त्रीय ग्रंथ नाही. पण त्यातला ‘कुळवाडी रिणे दाटली’ हा उल्लेख तत्कालीन समाजाबद्दल बरेच काही सांगून जातो. तत्कालीन महानुभावांच्या साहित्यातही तेव्हाच्या नागरिकांचे दरिद्री जिणे कोठे कोठे डोकावून जाते. एकंदर एकीकडे संपन्न सत्ताधारी वर्ग- जो प्रामुख्याने वैदिक धर्मानुयायी, उच्चवर्णीय होता; दुसरीकडे कर आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली प्रजा आणि तिसरीकडे सनातनी वैदिक धर्माला आलेला बहर असा तो समाज होता. या बहराची साधी कल्पना करायची असेल तर ज्ञानदेवांचे चरित्र डोळ्यांपुढे आणावे. त्यांच्या माता-पित्याला घ्यावे लागलेले देहान्त प्रायश्चित्त, निवृत्ती-ज्ञानदेव-सोपान-मुक्ता या बालकांची ससेहोलपट नजरेसमोर आणावी. संतांच्या चळवळीला प्रारंभ या अशा वातावरणात झालेला आहे.
सर्वसामान्यांचे जीवन बद्ध करणाऱ्या, व्रतवैकल्यांचा बुजबुजाट असलेल्या, बहुसंख्यांचे जगणे नरकप्राय करणाऱ्या वैदिक धर्माविरोधात तेव्हा आधी चक्रधरांनी बंड पुकारले. हेमाद्रीपंडिताने १२७४ मध्ये त्यांची हत्या केली. (त्यानंतर ते जिवंत झाले व उत्तरपंथास गेले, अशी महानुभावांची मान्यता आहे.) या हत्येचे कारण चक्रधरांनी वर्णविषमतेविरोधात ठोकलेले दंड होते, हे उघडच आहे. स्त्रियांच्या मासिक धर्माचीही अस्पृश्यता न मानणारा हा महात्मा. लीळाचरित्रातील त्यांचे हे विचार आज तर मुद्दामहून मुळातून पाहण्यासारखे आहेत.. ‘सर्वज्ञे म्हणीतले : वाइ : ये नवद्वारें : जैसी नाकी सेंबूड ए : डोळ्यों चिपूड : काना मळ : तोंडा थुंका ए : गुदिद्वारा मळ एति : ऐसी हे एकि धातु स्रवे : मग नीवतें : याचा विटाळ धरूं नए : जरि धरिजे प्रेतदेह होए :’
एकविसाव्या शतकालाही जड जाणारा हा विचार तेराव्या शतकातला आहे, हे पाहिले की त्याची धग किती मोठी असेल हे लक्षात येते. अशीच आग दिसते ती नामदेवांमध्ये. ज्ञानदेवांवर तत्कालीन ब्रह्मवृंदाने शूद्रत्व लादले होते. नामदेव जन्माने शूद्र. जन्मजात विषमतेचे बळी. ही क्रूर विषमता ज्या सनातनी वैदिक धर्मातून आली त्या विरोधात ते उभे राहिले. ‘कुश्चळ भूमीवरी उगवली तुळशी। अपवित्र तियेसी म्हणों नये। नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी। उपमा जातीची देऊ नये।’ असे बजावत त्यांनी मराठी मातीत भक्तिमार्गाची पताका रोवली. या भक्तिमार्गाने आव्हान दिले होते ते एकीकडे तेव्हाच्या ब्राह्मणशाहीला आणि दुसरीकडे वाढत्या इस्लामी आक्रमणाला! क्षुद्र देवतांची उपासना, तीर्थक्षेत्रांना जाणे, कर्मकांडांत रमणे यांत अजिबात अर्थ नाही, असे सांगणे याचा अर्थ पुरोहितवर्गाचा पाया डळमळीत करणे असाच होता. नामदेव तेच करीत होते. तुकोबांना वारसा लाभलेला आहे तो या इतिहासदत्त बंडखोरीचा. ‘नामदेवें केलें स्वप्नामाजी जागे’ असे आपल्या काव्यप्रेरणेविषयी बोलताना तुकाराम सांगतात तेव्हा त्याचा अर्थ हा असतो.
नामदेव आणि तुकोबा यांच्यात तीन शतकांचे अंतर आहे. या काळात महाराष्ट्रातील नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेले. या मधल्या काळात येथील समाजजीवनाचा पुरता ऱ्हास झाला होता. एकीकडे इस्लाम प्रबळ होत होता. धर्मातराला ऊत आला होता. अनेक ब्राह्मणही मुसलमानांचे दास बनले होते. अनेकांनी इस्लाम स्वीकारला होता. पंधराव्या शतकात वऱ्हाडात इमादशाहीची स्थापना झाली. त्याचा संस्थापक होता फतहुल्ला नावाचा सरदार. तो मूळचा तैलंगी ब्राह्मण. निजामशाहीचा संस्थापकही मूळचा ब्राह्मणच. त्याचे मूळ नाव- तिमाभट. वऱ्हाडच्या पाथरी गावच्या भैरव कुलकर्णी यांचा तो मुलगा. ही काही वानगीदाखल उदाहरणे. अशा प्रकारे इस्लाम स्वीकारावा, मुस्लीम राज्यकर्त्यांची सेवा करावी, हा तेव्हाच्या ब्राह्मण व क्षत्रियांचा परमधर्म बनलेला असतानाच सनातनी वैदिक धर्म पुन्हा प्रबळ होऊ पाहत होता. समाजजीवनात भ्रष्टता दाटून आली होती.
ऐसे धर्म जाले कळी । पुण्य रंक पाप बळी।।
सांडिले आचार । द्विज चाहाड जाले चोर।।
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासीं तोडी।।
अवघे बाह्य रंग । आत हिरवे वरी सोंग।।
हे तेव्हाचे समाजचित्र होते. अशा काळात तुकारामांचा उदय होणे ही एक प्रकारची अपरिहार्यताच होती असे आज वाटते. समाजाला ग्लानी येते तेव्हा असे महापुरुष जन्मास येतच असतात.
तुकारामांनी स्पष्टच म्हटले आहे-
‘उजळावया आलो वाटा। खरा खोटा निवाड।।’
तुकोबांनी उजळविलेली वाट मुळात होती कशी, हे पुढच्या लेखात पाहू. इतिहासाची कडी थोडक्यात समजून घेतल्यानंतर दुसरी कडी जी तत्कालीन व्यवस्थेची- ती समजून घेणेही महत्त्वाचे आहे.
tulsi.ambile@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2016 1:01 am

Web Title: saints tukaram
Next Stories
1 तुका लोकी निराळा : शब्दे वाटू धन जनलोका!
Just Now!
X