16 January 2019

News Flash

प्रतिमा आणि प्रक्रिया

म्हणजे उदाहरणार्थ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असे जे आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले आहे ते खरेच आहे.

जवाहरलाल नेहरू

म्हणजे उदाहरणार्थ प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असे जे आपल्या पूर्वजांनी म्हणून ठेवले आहे ते खरेच आहे. आता आपले पूर्वज म्हणजे कोण असे तुम्ही विचाराल, तर त्याचा अभ्यास सुरू आहे. कारण की पूर्वज अनेक असतात. परंतु त्यातील आपले पूर्वज नेमके कोण हे मात्र कालसापेक्ष असते. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी काही लोक म्हणत की नेहरू आणि गांधी वगैरे आडनावे असलेले लोक आपले पूर्वज होते, परंतु आता ते आपले पूर्वज नाहीत. कारण उत्खननामध्ये त्यांची जी छायाचित्रे सापडली आहेत त्यावरून ते आपले पूर्वज होते असे म्हणण्यास कोणतीही जागा सापडत नाही. नेहरू नावाच्या ज्या व्यक्तीची छायाचित्रे आज व्हाट्सअ‍ॅप विद्यापीठाच्या पाठय़पुस्तकांतून दिसतात, त्या सर्व छायाचित्रांचा इतिहाससंशोधक म. म. लेलेशास्त्री यांनी प्रगाढ अभ्यास केला आहे. आता अभ्यास म्हणजे काय व लोक तो का करतात हे कळण्यास मार्ग नाही. हल्ली अभ्यास वगैरे करण्याची कुप्रथा उदाहरणार्थ प्रचलित नाही. कारण हल्ली व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठामुळे अभ्यासपद्धतीची आवश्यकता राहिलेली नाही. तर लेलेशास्त्री यांचे म्हणणे असे, की नेहरू यांच्या छायाचित्रांत ते सतत बायकांमध्ये दिसतात. तसेच बायकांची सिगारेट शिलगावताना दिसतात. सिगारेट ही विदेशी गोष्ट असून, बायकांनी ती ओढल्यास त्यांना कॅन्सर होतो, हे येथे लक्षणीय आहे. तर अशी व्यक्ती भारत नावाच्या तत्कालीन देशाची पंतप्रधानच नव्हे, तर आपली पूर्वजही असू शकत नाही. यावर मात्र इतिहास संशोधकांत वाद आहेत. प्रा. हळगुंडीकर यांचे म्हणणे असे की नेहरूंची छायाचित्रे फोटोशॉप आहेत. यावर लेलेशास्त्रींचे म्हणणे असे, की नेहरूंचा काळ हा आजपासून शंभर वर्षे सांगितला जातो. त्या काळात फोटोशॉप हा प्रकारच नव्हता. लेलेशास्त्रींचे म्हणणे रास्त आहे, असे आमचे वैयक्तिक मत आहे. मात्र यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. नेहरूंची अधिक छायाचित्रे उपलब्ध झाल्यास ते करता येईल. लेलेशास्त्री यांनीही त्यांच्या ग्रंथामध्ये छायाचित्रांचे महत्त्व समजून सांगितले आहे. ते सांगतात की पूर्वी लोक काही तरी लिहून ठेवत असत. त्याकाळी लोक डायऱ्याही लिहीत. आज मात्र लिहिण्याची जागा उदाहरणार्थ छायाचित्रे व सेल्फ्यांनी घेतली आहे. छायाचित्रांतूनच खरा इतिहास उलगडतो. तो कसा याचे उत्तम उदाहरण लेलेशास्त्री यांनी दिले आहे. एखाद्या छायाचित्रात एखादी व्यक्ती एखाद्या कार्यक्रमात एखाद्या उदाहरणार्थ गुंडाबरोबर दिसली, तर ती व्यक्ती गुंडाची निकटवर्ती आहे असे मानण्याची संशोधनपद्धती विसाव्या शतकातच विकसित झाली होती.

शिवाय एकविसाव्या शतकात एका मुलीने आपल्या पित्याला लिहिलेली ट्विपण्णीही एका वस्तुसंग्रहालयात उपलब्ध आहे. त्यात ती मुलगी आपल्या पित्याला म्हणते की तुमचे भाषण विसरले जाईल, छायाचित्र मात्र कायम राहील व तेच तुमच्या फेक विधानांसमवेत फिरवले जाईल. तत्कालीन भारत देशाच्या राष्ट्रपतींची ती कन्या होती असा प्रवाद आहे. तर यातील फेक विधाने हा काय प्रकार आहे याबद्दल इतिहास संशोधकांत संभ्रम आहे. परंतु त्यातून छायाचित्रांचे महत्त्व वगैरे लक्षात येते. त्यांवर फोटोशॉप ही प्रक्रिया केल्यानंतर त्यांचे ऐतिहासिक साधने म्हणून मूल्य अधिकच वाढते. त्यालाच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असे पूर्वीच्या काळी म्हणत असावेत. आनंदाची बाब अशी की व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठाने फोटोशॉप प्रक्रियेशिवायच्या सर्व छायाचित्रांना फेक दर्जा द्यावा असा अध्यादेश काढला आहे. आता फेक म्हणजे काय? तर त्यावर संशोधन सुरू आहेच..

First Published on June 8, 2018 2:16 am

Web Title: jawaharlal nehru whatsapp