आपल्याकडे बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नांच्या निकटच घुटमळत असतात. पण ती आपल्या दृष्टीस पडत नाहीत. आता गुन्हेगारीचे उदाहरण. रोज ओरड असते सगळ्यांची की, गुन्हेगारी वाढतेय म्हणून. त्यावर इतका सोपा उपाय उपलब्ध आहे याची कल्पना भल्याभल्यांना नव्हती. हा उपाय आपल्या एका नेत्याने बरोब्बर निरखला. त्या नेत्याचे नाव नितीश कुमार. तूर्तास बिहारचे मुख्यमंत्री. नितीश कुमार यांनी बिहारमधील गुन्हेगारीवर जालीम उपाय शोधून काढला. जालीम फक्त म्हणण्यापुरता.

उपाय खरे तर अगदी मऊमुलायम. दुधावरची सायच जणू. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात नितीश यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारूबंदी लागू केली, आणि जादूची कांडी फिरवावी, तसा चमत्कार झाला. अपहरण हा बिहारमधील मोठा ‘उद्योग’. त्या प्रकरणांत ६१ टक्के घट झाली, खून २८ टक्क्यांनी घटले, दरोडे २३ टक्के कमी झाले. आणि त्याबदल्यात वाढले काय? तर, दूध व दुधाच्या पदार्थाच्या विक्रीत ११ टक्के वाढ झाली. ही सगळी आकडेवारी केवळ सांगोवांगी नाही. नितीश यांच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील ही माहिती आहे. म्हणजे बिहारमध्ये लोक आधी थंडगार मद्याचे प्याले रिचवीत. त्यास साथ असे ती चकली, फरसाण (गुजरातमधील नव्हे, बिहारमधील) आदी तामसी पदार्थाची. आता लोक गरमागरम, साययुक्त दूध पितात आणि सोबत पेढे-बर्फी असे सात्त्विक पदार्थ खातात. शिवाय दारूबंदीनंतर तयार कपडे, शिवणयंत्रे, क्रीडासाहित्य, कार, ट्रॅक्टर, दुचाकी यांच्या विक्रीतही वाढ झाल्याचे बिहार सरकारचे म्हणणे आहे. म्हणजे बघा, प्याला तोच असला तरी त्यातील द्रव बदलले तर किती मोठा फरक पडू शकतो. सामाजिक क्रांतीच जणू. खरे तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमार यांच्या या ‘एकच प्याला’च्या प्रयोगातून घेण्यासारखे खूपच आहे. हे प्रयोग खरे तर देशभर व्हायला हवेत. बिहारपुरते ते सीमित राहता कामा नयेत. देशभर अशी दारूबंदी लागू झाली की लोक मद्याऐवजी दुधाचे प्याले रिचवू लागतील. सोबत पेढे-बर्फी खाऊ लागतील. त्यातून त्यांची शारीरिक प्रकृती तर सुधारेलच, सोबत त्यांच्यातील तामसी गुणांचा लय होऊन राजस गुणांची वाढ होईल. मग कुणालाही कुणाला लुटावेसे वाटणार नाही, कुणालाही भूखंड लाटावेसे वाटणार नाही, कुणालाही पेड न्यूज द्यावीशी वाटणार नाही, कुणालाही कर्ज बुडवून परदेशी जावेसे वाटणार नाही, मुख्य म्हणजे कुणालाही काळा पैसा करावासा वाटणार नाही. तो तसा केला नाही तर नोटाबंदीसारख्या उपायांची गरज उरणार नाही. ती उरली नाही की सामान्यांना रांगांमध्ये उभे राहण्याचा जाच सहन करावा लागणार नाही. त्यामुळे दहाही दिशांत शांतता, प्रेम, सलोखा नांदू लागेल. विकास, समृद्धी म्हणजे तरी आणखी काय? एकच (दुधाचा) प्याला ही या विकासाची, समृद्धीची गुरुकिल्लीच. ही किल्ली आता आपल्या पंतप्रधानांनी हाती घ्यावीच..