.. तर सध्याच्या काळात आपल्या भारतवर्षांच्या काही प्रांतांतून, तसेच आपल्या महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे नागपुरादी विविध ठिकाणी जोरदार वारे वाहात आहेत. आपल्या देशाची रचनाच अशी आहे की दर पाच वर्षांनी हे असे वारे त्या त्या ठिकाणी वाहात असतात. त्यातील सर्वाधिक जोरदार वारे वाहतात तेव्हा खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असते. कुणाच्या घरावरची कौले गायब होऊ शकतात, कुणाच्या घराचे वासे फिरू शकतात, कुणाच्या घराची पडझड होऊ शकते, कुणाच्या घराचा पायाही उखडला जाऊ शकतो. याउलट, हेच वारे एखाद्याच्या घरावर सोन्याची कौले आणून बसवतात, एखाद्याला चांगले भरभक्कम घर उभारून देतात, एखाद्याच्या घराचा पायाही घालून देतात हे वारे. पण या वाऱ्यांचा जोर किती काळ टिकेल काहीच सांगता येत नाही कुणाला. आता जवळपास तीन वर्षांपूर्वी समस्त भारतवर्षांत जे वारे वाहिले होते तसेच वारे आत्ताही वाहात आहेत, असे मानतायत काही जण. त्या वाऱ्यांचे केंद्रस्थान त्यावेळी गुजरातमध्ये होते. ते नंतर दिल्लीत सरकले. त्यावेळी वाहिलेल्या वाऱ्यांचा जोर अद्याप कायम आहे आणि तसेच ते वाहात राहतील, असे काही जणांचे म्हणणे. अगदी स्टँपपेपरवर, ‘ही माझी भविष्यवाणी आहे’, असे लिहून द्यायला तयार आहेत ते. पण परवाच पुण्यात जे दिसलं त्यावरून भल्याभल्यांनी दावे करायला सुरुवात केलीये की.. ‘वारे फिरले आहेत’ काही जणांनी तर आत्ताच, ‘फिरवून दाखवले’, असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. खरे तर वारे कुठूनही कुठेही वाहोत, ते असतात पारदर्शीच. मग ते दिसणार कसे? आता ते सामान्यांना नसतील दिसत, पण जनवनात कठोर तपश्चर्या केली की दिसतात म्हणे काही पुण्यवंतांना. त्यातूनच, ‘पुण्यात हे वारे दिसले नाहीत हो.. दिसले नाहीत, याचा अर्थ ते फिरले आहेत’, असे काही जण छातीठोकपणे सांगतायत. वाढलेल्या तापमानामुळे सध्या या वाऱ्यांचे दिसण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यांचा जोर ओसरतो आहे, असे काही मंडळींचे म्हणणे. आता हे तापमान अनेक गोष्टींमुळे वाढू शकते. हे पुराणकथांसारखे वाटू शकेल, पण ‘दिलेली वचने पाळली नाहीत तर निसर्ग कोपतो आणि त्याचा राग असा उकाडय़ातून प्रकट होतो’, असे जुनीजाणती मंडळी सांगतात. ‘असत्य असे काही बोललेले निसर्गाला आवडत नाही, त्यामुळेही तापमान वाढू शकते’, असे म्हणतात. ‘शब्दाला शब्द लागला की, किंवा एखाद्या कुणी दुसऱ्याबद्दल शापवाणी उच्चारली तरीही तापमापकातील पारा वर चढू शकतो’, असे या हवेचा वर्षांनुवर्षांचा अभ्यास असलेले लोक सांगतात. एकुणात काय, तर सध्या दिवस आणि रात्रीही वाऱ्याच्या आहेत. त्यातील कुठल्या वाऱ्यांचे गाणे अधिक जमतेय, कुठल्या वाऱ्याचे गाणे पडतेय, हे कळेलच लवकर. तोवर आणि नंतरही आपल्याला आहेच आपले रोजचे गाणे..