मुंबई : दोन वर्षांनंतर करोनाविषयक निर्बंध हटविल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात येत आहे. आकर्षक कंदिल आणि दिव्यांच्या लखलखाटात मुंबई उजळून निघाली असून मुंबईकरांनी लक्ष्मीपूजनाचे निमित्त साधून सोमवारी संध्याकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत फटाक्यांचा धूमधडाका सुरू होता. परिणामी, काही भागात आवाजाच्या नियमांचे तीनतेरा वाजले आणि काही भागात आवाजाची पातळी १०७ डेसिबलवर पोहोचली होती. तसेच वायू प्रदुषणातही भर पडत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> माथेरानमध्ये लवकरच ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू होणार ; दादर, एलटीटी, कल्याणमध्येही सेवा उपलब्ध करणार

गेली दोन वर्षे करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना अटीसापेक्ष उत्सव साजरे करावे लागले होते. मात्र करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने दहीहंडी उत्सवापूर्वी निर्बंध हटविले. त्यामुळे दहीहंडी उत्सवापाठोपाठ आलेला गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यामुळे दिवाळीनिमित्त खरेदीला उधाण आले होते. ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये कपडे, फटाके, भेटवस्तू, फराळ आदींच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. गेली दोन वर्षे करोनामुळे कोमेजलेला फुलबाजार दिवाळीनिमित्त गर्दीने फुलला होता. फटाक्यांच्या खरेदीसाठीही ठिकठिकाणच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.

हेही वाचा >>> म्हाडातील बदल्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर?

राज्य सरकारने पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. मात्र बहुसंख्य मुंबईकरांनी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी केली. मुंबईत रात्री १० नंतर फटाके वाजविण्यास मनाई आहे. मात्र मुंबईकरांना या नियमाचा विसर  पडला होता. मुंबईतील विविध भागांमध्ये  सोमवारी रात्री उशीरापर्यंत फटाक्यांचा धूमधडाका सुरूच होता. जुहू, वांद्रे, वरळी, मरिन ड्राइव्ह, शिवाजी पार्क यासह विविध भागांमध्ये रात्री उशीरापर्यंत फटाके फोडण्यात नागरिक दंग होते. यासंदर्भात काही नागरिकांनी ट्विटवरून मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. मरिन ड्राईव्ह परिसरात सोमवारी रात्री ११.४५ नंतर मोठा पोलीस बंदोबस्त होता. मात्र असे असतानाही तेथे मोठा आवाज करणारे फटाके फोडण्यात येत होते. शिवाजी पार्कवर मध्यरात्री १२ नंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. शिवाजी पार्क परिसरात रात्री उशीरापर्यंत मोठ्या संख्येने नागरिक जमले होते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेक भागात आवाजाच्या नियमांचा भंग झाल्याचे आढळून आल्याची माहिती आवाज फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी दिली.

शिवाजी पार्कवर सोमवारी फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. त्यामुळे रात्री ९.४५ च्या सुमारास या परिसरात आवाजाची पातळी १०३.४ डेसिबल इतकी होती. तर, रात्री १२ च्या सुमारास फटाक्यांमुळे आवाजाची पातळी १०७ डेसिबल वर पोहोचली होती.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire crackers generated noise levels at 107 decibels on lakshmi pujan mumbai print news zws
First published on: 25-10-2022 at 16:56 IST