गेल्या काही दिवसांपासून ताबा रेषेवर भारत आणि चीनदरम्यान तणावाचा वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी एकमत झालं असलं तरी चीनच्या कुरापती मात्र कमी होत नाहीत. दरम्यान, आवश्यकता भासल्यास चीनला योग्य भाषेत उत्तर देण्यासाठी आता भारतानंही पॅरा स्पेशल फोर्स युनिट तैनात केलं आहे.

“पॅरा स्पेशल फोर्सेस युनिट्स देशातील वेगवेगळ्या भागांमधून लडाखमध्ये तैनात करण्यात आली आहेत,” अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळ उद्ध्वस्त करताना पॅरा स्पेशल फोर्सेसनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच आवश्यकता असेल तेव्हाच चीनच्याविरोधातही ते मोलाची भूमिका बजावू शकतील,” असं सूत्रांनी सांगितलं.

या पॅरा स्पेशल फोर्सेस युनिट्सना पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आलं आहे. भारतात सधघ्या १२ पेक्षा अधिक स्पेशल फोर्सेसच्या रेजिमेंट आहेत. तसंच त्यांना देशातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रशिक्षण देण्यात येतं. जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलेल्या स्पेशल फोर्सेच्या तुकड्या लेह आणि त्याच्या आसपासच्या भागातील उंच क्षेत्रात नियमित युद्धसराव करत असतात.

काही दिवसांपूर्वी भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतानंही दिलेल्या प्रत्युत्तरात चीनचे २० सैनिक ठार झाले होते. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवरही चर्चा करण्यात आली होती. त्यानंतरही चीनच्या अनेक कुरापती सुरू होत्या. तसंच चीनच्या या कृत्यानंतर देशभरातून चीनचा विरोध वाढू लागला होता. तसंच चिनी वस्तूंवरही बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली होती. अशातच काही दिवसांपूर्वी भारतानं चीनची ५९ अॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता.