आसनगाव रेल्वे स्थानकातील प्रकार; पाच वर्षांपूर्वी पाडलेल्या पादचारी पुलाची प्रतीक्षा कायम

कल्याण : मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आसनगाव रेल्वे स्थानकात कसारा बाजूकडे असणारा पादचारी पूल पाच वर्षांपूर्वी धोकादायक झाल्याने पाडण्यात आला आहे. या पादचारी पुलाचे काम अजूनही हाती घेण्यात येत नसल्याने प्रवासी रेल्वे मार्गातून ये-जा करतात. असा प्रवास करताना दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न प्रवासी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी रेल्वे मार्गातून ये-जा करू नये म्हणून फलाट क्रमांक दोनच्या बाजूला २०० फूट लांब, आठ फूट उंचीची दगडी िभत बांधली. ही िभत रात्रीच्या वेळेत तोडून प्रवाशांनी रेल्वे मार्गातून येण्यासाठी मार्ग तयार केले. या तोडलेल्या भिंती िलपण्याचे काम रेल्वेने पूर्ण केले. आसनगाव रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर शहापूरकडे जाण्यासाठी बस, रिक्षा, खासगी वाहने रेल्वे स्थानकाच्या उत्तर दिशेला उभ्या असतात. या दिशेला जाण्यासाठी यापूर्वी कसारा बाजूने असणारा पादचारी पूल धोकादायक ठरत असल्याने रेल्वेने तो पाडला आहे. या पुलामुळे प्रवाशांना झटपट रिक्षा, बस वाहनतळाकडे जाता येत होते. शहापूर तालुक्यात २५०हून अधिक गावे आहेत. गावांमधील बहुतांशी रहिवासी नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे, नाशिककडे जाण्यासाठी बस, रिक्षा, दुचाकी, खासगी वाहनाने आसनगाव रेल्वे स्थानकात येतात. अनेक भाजी उत्पादक लोकलने भाजीपाला घेऊन कल्याण, भायखळा येथे जातात. आदिवासी महिला केळीची पाने, तेंदु, फूलपुडीसाठी लागणारी मोह, पळसाची पाने घेऊन बारमाही या स्थानकातून प्रवास करतात.

प्रवाशांचा द्रविडीप्राणायाम

कसारा बाजूकडील पूल तोडल्याने बस, रिक्षेतून शहापूरकडून आसनगाव येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी असलेल्या जिन्याने रेल्वे स्थानकात जावे लागते. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी फलाटावरुन ३० पायऱ्यांचा जिना चढून पहिल्या माळ्यावरील तिकीट घरात तिकीट काढावे लागते. यापूर्वी कसारा बाजूकडे जुना जिना होता, त्या वेळी प्रवासी शहापूरकडून येऊन जिन्याने चढून बाजूला तिकीट काढून थेट फलाटावर येत होते. आता मात्र फेरा पडत असल्याने द्रविडीप्राणायाम करावा लागतो.

दूध विक्रेत्यांची व्यथा

६० लिटर दुधाच्या किटल्या घेऊन रेल्वे स्थानकात येताना दूध विक्रेत्यांची हैराणी होते. हे विक्रेते रेल्वे मार्गाजवळील संरक्षित भिंतीवरून उडय़ा मारून दुधाच्या किटल्या स्थानकात आणतात. दररोज दुधाच्या किटल्या जिन्यांवरून चढविणे शक्य नाही, असे दूध विक्रेते जनार्दन विशे यांनी सांगितले. या स्थानकाला उद्वाहनाची सुविधा नाही. रेल्वे प्रवासी संघटनांनी जिन्याचे काम लवकर पूर्ण करावे म्हणून रेल्वे अधिकाऱ्यांकडे तगादा लावला आहे.

मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर अनेक पादचारी पूल मंजूर आहेत. ही कामे अतिशय संथगतीने केली जातात. आसनगाव रेल्वे स्थानकातील कसारा बाजूकडील पुलाचे काम लवकर सुरू करावे म्हणून आम्ही अधिकाऱ्यांच्या मागे पाठपुरावा करीत आहोत.

नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी महासंघ

आसनगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने पुलांची उभारणी केली आहे. मधल्या पुलाने पूर्व-पश्चिम, सीएसएमटी बाजूकडील पुलाने ये-जा करता येते. कसारा बाजूकडील पुलाचे काम सुरू आहे. एका स्थानकात तीन पादचारी पूल पुरेसे आहेत.

प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे