राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंदा यांच्यासोबत पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात भेदभाव झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून राष्ट्रपती भवन प्रशासनाकडून पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदिप्तकुमार मोहापात्रा यांनी देखील राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले असून याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सपत्नी १८ मार्च २०१८ रोजी पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, सेवेकऱ्यांच्या एका गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून त्यांना रोखले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. हा वादग्रस्त गंभीर मुद्दा २० मार्च रोजी श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आला होता.
१८ मार्च रोजी राष्ट्रपतींसोबत घडलेल्या या भेदभावाच्या प्रकारानंतर १९ मार्च रोजी राष्ट्रपती भवनातून पुरीचे जिल्हाधिकारी अरविंद अग्रवाल यांना कडक शब्दांत पत्र लिहिण्यात आले. यामध्ये सेवेकऱ्यांकडून करण्यात आलेल्या भेदभावाच्या गंभीर प्रकारावर आक्षेप घेण्यात आला. दरम्यान, श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे मुख्य प्रशासक आयएएस अधिकारी प्रदीप्तकुमार मोहापात्रा यांनीही राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत असा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. मात्र, हे प्रकरण गंभीर असल्याने त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.
मोहापात्रा म्हणाले, या प्रकारावरुन काही दिवसांपूर्वी मंदिर प्रशासनासोबत आम्ही बैठक घेतली. या बैठकीत ठरल्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. राज्यसभा खासदार आणि बिजू जनता दलाचे प्रवक्ते प्रताप केसरी देब यांनीही याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून तसेच मंदिर प्रशासनाकडून चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर भाष्य करणे टाळले.
१८ मार्च २०१८ रोजी राष्ट्रपती श्री जगन्नाथ मंदिराला भेट देणार असल्याने मंदिर सकाळी ६.३५ पासून ८.४० या वेळेत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीसोबत मंदिरात काही सेवेकरी आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, काही सेवेकऱ्यांनी राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीला मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून थांबवले तसेच धक्काबुक्कीही केली.
यावर काँग्रेस नेते सुरेश रौतरे म्हणाले की, या अप्रिय घटनेला टाळण्यात जिल्हा प्रशासन अपयशी का ठरले. आजवर सर्वसामान्य भाविकांना अशा भेदभावाला सामोरे जावे लागत होते. मात्र, आता देशाच्या राष्ट्रपतींनाही त्याला सामोरे जावे लागत असून हा गंभीर प्रकार आहे.