कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. किनारपट्टीच्या भागात एक ते दोन दिवस जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र बहुतांश ठिकाणी, तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

बंगालच्या उपसागरापाठोपाठ गेल्या दोन दिवसांत पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्या हे क्षेत्र तीव्र झाले असून, अरबी समुद्रातून उत्तर महाराष्ट्रमार्गे पश्चिम मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबई आणि पुण्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर, सांगली, महाबळेश्वर आणि कोकणात काही भागांत पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात आणखी तीन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात एक ते दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार असून, २३ नोव्हेंबरनंतर या भागात हवामान कोरडे होणार आहे. विदर्भात पुढील तीन ते चार दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार आहे.

पाऊसभान…

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण विभागात कायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागांत पावसाळी वातावरण राहणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाळी वातावरण राहणार आहे.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy weather days ysh
First published on: 20-11-2021 at 01:53 IST