नागपूर : नोकरीसाठी त्याने अनेक प्रयत्न केले. महत्प्रयासानंतर ती मिळाल्यावर तो आनंदी होता. मात्र कामावर रुजू होण्यापूर्वीच नियतीने त्याच्यावर घाला घातला व त्याचा नोकरीचा आनंद आणि सुखी आयुष्याची स्वप्नेही हिरावून घेतली. रितिक मंगेश रेवतकर (२३) रा. तकिया धंतोली असे या तरुणाचे नाव आहे. त्याचे मंगळवारी मेंदूघाताने त्याचे निधन झाले.

रितिक होतकरू तरुण होता. हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत त्याने शिक्षण पूर्ण केले होते. नोकरीचा शोध सुरू होता. एका खासगी कंपनीत नोकरीची संधी मिळाली. तेथे त्याला २१ ऑक्टोबरला रुजू व्हायचे होते. नोकरी मिळाल्याने आनंदी होता. याच आनंदात त्याने नवे कपडेही शिवले होते. मात्र रुजू होण्याच्या एकदिवस आधी म्हणजे २० तारखेला रात्री ९ वाजता त्याला मेंदूघात झाला. त्याला तातडीने धंतोलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दुसऱ्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र त्यानंतरही प्रकृती ढासळतच गेली. अखेर मंगळवारी त्याची प्राणज्योत मावळली. त्याला नोकरीवर रुजूच होता आले नाही. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. रितिकच्या अशा अकाली जाण्याने रेवतकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.