आज आपण हवामानशास्त्र या उपघटकाअंतर्गत येणाऱ्या भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय व स्थानिक वाऱ्यासंदर्भात माहिती घेऊयात. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेसाठी हा उपघटक महत्त्वाचा आहे.
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे
* विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा : ५ अंश उत्तर आणि ५ अंश दक्षिण या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. या पट्टय़ाला ‘विषुववृत्तीय शांत पट्टा’ असेही म्हणतात. विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते.
* कर्कवृत्तीय व मकरवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे : २५ अंश ते ३५ अंश उत्तर ते दक्षिण विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ातून ऊध्र्वगामी बनलेली हवा वर जाते व तेथे थंड होऊन ती कर्कवृत्त व मकरवृत्तावर अधोगामी दिशेने येते. त्यामुळे २५ अंश ते ३५ अंश उत्तर व दक्षिण पट्टय़ात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. या पट्टय़ाला ‘उपउष्ण कटीबंधीय जास्त दाबाचा पट्टा’ असेदेखील म्हणतात
* उपध्रुवीय/ समशीतोष्ण कमी दाबाचा पट्टा : दोन्ही गोलार्धात ६० ते ७० अक्षवृत्ताचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून या प्रदेशांत हवेचा दाब कमी असतो. पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे या पट्टय़ातील हवा बाहेर फेकली जाते. त्यामुळे हवा विरळ होऊन येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा (Polar High) : ध्रुवावर तापमान कमी असते. त्यामुळे तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
* कोरिऑलिस फोर्स (Coriolis Force) : पृथ्वी फिरताना तिच्याभोवती वातावरणदेखील फिरत असते. पृथ्वीच्या गतीमुळे निर्माण होणाऱ्या या शक्तीला ‘कोरिऑलिस फोर्स’ असे म्हणतात. यामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेवर परिणाम होतो. यासंबंधी महत्त्वाचे संशोधन फेरल या शास्त्रज्ञाने केले. त्यानुसार कोरिऑलिस फोर्समुळे वारे हे उत्तर गोलार्धात वाहताना आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ाच्या दिशेने वाहतात तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडय़ाळाच्या विरुद्ध दिशेने वाहतात- म्हणजेच आपल्या मूळ दिशेकडून डावीकडे वाहतात.
* आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा : विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्रित येतात, त्यांना ‘आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभवन पट्टा’ असे म्हणतात.
* अश्व अक्षांश (Horse Latitudes) : कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५ अंश ते ३० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो, या पट्टय़ाला ‘अश्व अक्षांश’ असे म्हणतात. हा पट्टा शांत पट्टा आहे.
* ग्रहीय व स्थानिक वारे (Planetary Winds) : पृथ्वी या ग्रहाच्या विस्तीर्ण प्रदेशात नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ग्रहीय वारे’ असे म्हणतात. या वाऱ्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते- व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, ध्रुवीय वारे.
१. व्यापारी वारे / पूर्वीय वारे : उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्त दरम्यान कर्क व मकरवृत्तीय हवेच्या जास्त दाबाचे पट्टे आहेत. येथून विषुववृत्ताजवळील ० ते ५ अंश उत्तर व दक्षिण दरम्यान असणाऱ्या कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
व्यापारी वारे १० अंश ते २५ अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान
वाहत असतात. पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्याचा
उपयोग होत असे, म्हणून त्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार
आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून म्
पश्चिमेकडे वाहतात म्हणून यांना ‘पूर्वीय वारे’ असे म्हणतात.
* व्यापारी वाऱ्यांचे दोन उपप्रकार असतात-
= उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे
= दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2015 रोजी प्रकाशित
एमपीएससी (पूर्वपरीक्षा)- भूगोल
आज आपण हवामानशास्त्र या उपघटकाअंतर्गत येणाऱ्या भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय व स्थानिक वाऱ्यासंदर्भात माहिती घेऊयात. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेसाठी हा उपघटक महत्त्वाचा आहे.

First published on: 14-03-2015 at 02:26 IST
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta spardha guru mpsc 14 march