News Flash

मोडता!

लग्न झाल्यावर एका इमारतीत राहणाऱ्या चौघींचा गट बनतो. गप्पाटप्पा, विनोद होतात.

लग्न झाल्यावर एका इमारतीत राहणाऱ्या चौघींचा गट बनतो. गप्पाटप्पा, विनोद होतात. संध्याकाळी एकत्र फिरणे होते. त्यामुळे आनंदीआनंद आहे, असं वाटते. पण जेव्हा एखादा कार्यक्रम ठरवला की मोडकरणी मोडता घालतात आणि स्वत:चे मत मांडून (अर्थात् विरुद्ध) स्वत:ला महत्त्व घेतात.

मीना, लीना, नीना तिघींनी नाटकाला आज जायचे ठरवले की बिना म्हणते, आज नको ग! उद्या जाऊ या. आज मला खूप कामे आहेत. काही वेळेस लहान होऊन बँडवाल्यांसारखे एकाच रंगाचे ड्रेस (कपडे) घालू या ठरलं की ती म्हणते, हिरव्या रंगाचे घालू या. सर्वजणी (चौघी) हिरव्या रंगाचे पंजाबी-सूट घालून भटकायला जातात. बिनाला जिंकल्याचा आनंद मिळतो.

सुट्टीत पुण्याला जाऊन धमाल करू या, ठरवले की बिना नाशिकला जाऊ या म्हणणार. बऱ्याच वाद-विवादानंतर  शेवटी नाशिक ठरते. मैत्रिणीला कशाला दुखवा; म्हणून नाशिकला जाण्याचे ठरते.

विरुद्धपणाचा मुद्दा सोडला; तर बिना मदतीचा हात देते. विनोद सांगून सर्वाना हसवते. चांगले पदार्थ बनवले की तिघीनांही देतेच देते. पैशाच्या गरजेला पण उभी राहते. स्वभाव बोलका, वाचन दांडगे त्यामुळे वैचारिक पातळीपण चांगली आहे. परंतु सर्वानुमते ठरलेले करायचे नाही, हा तिचा स्वभावदोष तिघीही पचवतात.

एकदा तिघी मैत्रिणी बिनाला सांगतात की आपण सिनेमाला जाऊ या, पण मनात नाटकाला जायचे असते. बिना आपल्या स्वभावाप्रमाणे विरुद्ध  बोलते की, नाटकाला जाऊ या. तिघींना जिंकल्याचा आनंद मिळतोच; पण बिनाला कसे काय वळवायचे ते कळते. उलटे विचारायचे; म्हणजे ती सुलट उत्तर देणार. सकारात्मक विचार तिघींनी करायचे ठरवले; म्हणजे चौघींचे चौकुट एकत्र राहणार.

अचानक तिघीजणी बिनाला विचारतात की, या वेळेस तू कुठे, कधी हॉटेलात जायचे ते ठरवा. एकदम ‘बॉम्ब’ पडल्यावर हादरायला होते; तशी हादरते. मी नाही ठरवत, तुम्हीच ठरवा. पण तिघीही गोड हट्ट करतात की यावेळेस तुझ्या मताप्रमाणे वागायचे. ती आणखी गोंधळात पडते; कारण कार्यक्रम ठरवायचे माहीत नसते; तर कार्यक्रमात फेरफार करायला आवडते नां! पण तिघींचा तगादा चालू असतो. मग शेवटी जवळचे व छोटे हॉटेल सांगते. तिघीही नकार देतात. मग लांबचे व मोठे हॉटेल सांगते. तरी तिघींची नकार घंटा चालू; तेव्हा बिना चिडते. मग तिघी पाच-दहा हॉटेलांची वेगवेगळी नावे घेतात व सांगतात की, आता तू यातले निवड. शेवटी एक ठरते. आणि तिकडे पोचल्यावर तिघीजणी मनमोकळेपणाने सांगतात की, दरवेळेस तू मोडता घालतेस ना?  मोडता घातल्यावर कसे काय वाटते, हे तुला कळायला पाहिजे; म्हणून आम्ही नाटक केले. बिऽऽच्चारी!

पत्ते खेळण्याचा दिवस ठरलेला असतो; पण काही ना काही कारण सांगून दिवस बदलवून घ्याचा तिचा शिरस्ता. एकदा तिघीजणीच खेळल्या व बाहेरून छान छान खाण्याच्या वस्तू मागवून तिघींनी धम्माल केली. दुसऱ्या दिवशी कित्ती गंमत केली, त्याचे रसभरीत वर्णन! तरी तिचे डोळे उघडले नाहीत. आत्ता काय करावे बरे? सगळेच प्रश्न सोडवले जात नाहीत. काही सोडून दिले तर आपल्या आपण सुटतात.

घरातपण तोच प्रकार. सासूबाईनी किंवा मोठय़ा जाऊबाईंनी काही म्हटले; तरी त्यांच्या विरुद्ध मत नोंदवून मोडता घालायचा. पाहुण्यांना आज जेवायला बोलवूया का विचारले; तर परवा-तेरवाचा दिवस सांगायचा.  एकदा तिला (बिनाला) न विचारता भोजनाचा कार्यक्रम ठरवला;  तर पोट दुखते म्हणून खोलीत राहिली. सासू-जावेने फक्कड बेत करून सर्वाना भोजनसुख दिले आणि नंतर सर्वाचे आवडते ‘आईस्क्रीम’ आणले. पाहुण्यांसकट घरातील मंडळी तृप्त झाली. बिनाला मात्र खिचडी-कढी – पापड खावा लागला.

वादाशिवाय घर नाही आणि मतभेदाशिवाय नाते नाही. आपलेच म्हणणे प्रत्येकाला बरोबर वाटते; वाद, मतभेद चिघळतात. एकाने पडती बाजू घेतली की सर्व शांत होते. नंतर मार्ग सुचतोच. बिनाचा फक्त विरोधाला विरोध असतो. ती राजकारणी नाही; तरी असे का वागते, हे कोणालाच कळत नाही. नवऱ्याने किती तरी वेळा समजावून सांगितले; पण पालथ्या घडय़ावर पाणी! आयुष्यातील नकारात्मक गोष्टी काढल्या की चांगल्या गोष्टीसाठी मनात जागा तयार होते, हे स्वामी विवेकानदांचे म्हणणे लक्षात ठेवावे. सकारात्मक विचारांची जोड द्यावी. परिस्थितीचे चित्र पालटते.

नखे वाढली की बोट न कापता फक्त नखे कापतो. तसेच विरोधाचा अहंकार कापा; पण नात्याला कापू नका. सहनशक्तीलापण मर्यादा असते. बिनाचे दोनदा-तिनदा ऐकले की ती दरवेळेस डोक्यावर बसली; तर  सर्वाचा तोल सुटतो आणि तडतड फुटाणे बाहेर पडून नात्यातला गोडवा पुसला जातो. तेव्हां दरवेळेस आपला हट्ट चालवणे बंद केले पाहिजे. जे पेराल, तेच उगवते. केळी लावली तर पपई येण्याची अपेक्षा करू नये. बदल घडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही. त्याकरता स्वत:ची मते बदलता आली पाहिजेत. ज्यांना स्वत:चे मत/मत बदलवता येत नाही, ते कशातच बदल घडवू शकत नाहीत आणि मग रडत बसतात.

आपल्याला माहीत असते की रांगोळी दुसऱ्या दिवशी पुसली जाणार आहे; तरी आपण त्यात छान छान रंग भरून आकर्षक करतो. जीवनही रांगोळीसारखे आहे. आपल्याला माहीत आहे की जीवन संपणार आहे. तरी आपण जीवन सुंदर बनवण्याचा प्रयत्न करावा. बिना मोडताराणी म्हणून लक्षात राहण्यापेक्षा मदतनीसराणी लक्षात राहिली; तर काय हरकत आहे? तेव्हा बिनाला परिवर्तन करण्याकडे वळवावे लागेल.
रेखा केळकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2016 1:08 am

Web Title: article by rekha kelkar
Next Stories
1 अमृततुल्य चहा
2 वृक्षपूजनाची भारतीय परंपरा
3 गरज जलसाक्षरतेची
Just Now!
X