04 August 2020

News Flash

सहजीवनाचा उत्तम मंत्र

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्तानं १३ फेब्रुवारीला प्रसिद्ध ‘आपलं माणूस’ ही कवी चंद्रशेखर गोखले यांची कथा

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्तानं १३ फेब्रुवारीला प्रसिद्ध ‘आपलं माणूस’ ही कवी चंद्रशेखर गोखले यांची कथा आणि माधवी शिंत्रे यांचं ‘तुझा स्पर्श झाला असा जीवनाला’ हे पती रामकृष्ण यांना लिहिलेलं अनावृत पत्र वाचून असे पती लाभलेल्या स्त्रियांचा अनेक स्त्रियांना हेवा वाटणारच. ‘व्हॅलेंटाइन’ शब्दात अभिप्रेत असलेली समर्पणाची भावना यात जेवढी जास्त तेवढी सहजीवनाच्या यशाची खात्री असते. नाही तर एकमेकांचे अहंकार डिवचण्यात किंवा जपण्याचं नाटक करण्याच्या धडपडीत संसाराचं समरांगण व्हायला वेळ लागत नाही.
सुलभा शेरताटे यांच्या ‘सोबत जगताना’ या लेखात रेव्हरंड टिळक आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांच्या संदर्भदाखल्यातून हीच गोष्ट चांगल्या प्रकारे अधोरेखित केली गेली आहे.
कौटुंबिक वादळं उग्र रूप धारण करू नयेत असं वाटत असेल तर आपण दुसऱ्याला त्याच्या सर्व गुणदोषांसकट स्वीकारलं आहे याची खात्री देत राहणं आणि त्यासाठी वाद विकोपाला न जाऊ  देता, ‘माझ्यासाठी तूच सर्वस्व आहेस’ ही समर्पणाची भाषा आत्मसात करणं अन् दुसरा दिवस एकमेकांच्या सहवासात चालू करणं हाच येणारे क्षण सुखाचे करण्याचा मार्ग आहे हे लक्षात ठेवावं.
– श्रीपाद कुलकर्णी, पुणे

हेवा वाटला
१३ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या ‘तुझा स्पर्श झाला असा जीवनाला’ वाचून माधवी आणि रामकृष्ण शिंत्रे यांचा प्रचंड हेवा वाटला. तुम्ही दोघंही खूप सुदैवी आहात! तुम्ही दोघं एकमेकांचं कृतीतून व शब्दातून इतकं भरभरून कौतुक करू शकता हेच तुमच्या
सुंदर सहजीवनाचं रहस्य आहे असं मला वाटतं.
अनेक दाम्पत्यांनी बोध घ्यावा असाच हा लेख आणि जीवन आहे.
– नमिता पाटील

रसाळ शैलीच्या निवेदिका!
१३ फेब्रुवारीच्या ‘दृष्टीआडची सृष्टी’ या सदरातला मंगला खाडिलकर यांचा लेख वाचला. मंगलाताई एक यशस्वी निवेदिका म्हणून परिचित आहेत. त्या मागे त्यांची अनेक वर्षांची तपश्चर्या आणि परिश्रम आहेत. दमदार आवाजाबरोबरच हजरजबाबीपणा हा निवेदकाकडे असावा लागतो. अनेक कार्यक्रमांमधून निवेदिकेची भूमिका पार पाडताना मंगला खाडिलकरांनी हजरजबाबीपणाचे प्रत्यंतर आणून दिले आहे. निवेदक किंवा सूत्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळताना त्या विषयाची किंवा व्यक्तींची माहिती असणे आवश्यक असते. शिवाय कार्यक्रम कंटाळवाणा होऊ न देता रंजकपणा आणण्याचीदेखील जरुरी असते. चतुरस्र वाचन हवे तसेच ताज्या घटनांची नोंद हवी. मंगलाताईंकडे हे सर्व गुण असल्याने त्या निवेदिका किंवा सूत्रसंचालक असलेल्या कार्यक्रमात
एक रसरशीतपणा असतो. आपल्या रसाळ निवेदनशैलीने मंगलाताईंनी रसिकांमध्ये मानाचे स्थान पटकावले आहे.
– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण

चतुरंगचे स्वरूप भावणारे
१३ फेब्रुवारीची ‘चतुरंग’ पुरवणी मनापासून आवडली. एकीकडे ‘तुझा स्पर्श झाला असा जीवनाला’ हे माधवी शिंत्रे यांचे पत्र तर दुसरीकडे ‘वसंतातील पानगळ’ हा मृणालिनी चितळे यांचा लेख. एक समजूतदार सहजीवनाचा आविष्कार तर दुसऱ्यात बायकोचे प्रत्येक शब्दागणिक हसत हसत केलेले खच्चीकरण. जन्म कोणत्या घरात घ्यायचा हे माणसाच्या हातात नसतं. त्याचप्रमाणे नातलग निवडण्याचा अधिकारही त्याला नसतो. सगळ्यांना स्वभावानुसार सांभाळून संसार करणे खर म्हणजे अवघडच! तरीही स्वत:ला आयुष्यात मनापासून काय करायला आवडेल हा विचार माणसाने करायला हवा. पण हे कळायलाही अर्धा जन्म जावा लागतो.
असो. ‘सोबत जगताना’, ‘आपलं माणूस’ हे लेखही उत्तम. ‘उत्तरा केळकर यांचेही लेख आवडतात. २०१६ मधील ‘चतुरंग’ पुरवणीचे स्वरूप एकदम भावणारे आहे.
– माधुरी वरुडकर, नाशिक
घटस्फोट टाळता येतील!
‘ओळखीचं गाठोडं’ ३० जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या या लेखातील वैचारिक मतभेदांमुळे होणाऱ्या वाढत्या घटस्फोटांबाबत चिंता व्यक्त केली आहे, पण यात नवदाम्पत्यांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करणे खूपच गरजेचे वाटते, कोणतीही व्यक्ती पूर्णपणे निदरेष असणे शक्य नाही हे सत्य समजावून घेतले पाहिजे व ‘जिथे तुम्ही कमी तिथे आम्ही’ या न्यायाने चालल्यास घटस्फोट टाळता येतील. तसेच पालकांनीही सामंजस्याचा मार्ग दाखविल्यास सकारात्मक उर्जा व परिणामी घटस्फोट टाळण्यास ते अनुकूल ठरू शकते. विवाह अनोळखी व्यक्तीशी करण्यापेक्षा ओळखीतच केल्यास घटस्फोटांचे प्रमाण कमी होऊ शकेल काय? याविषयी चर्चा होणे गरजेचे वाटते. याशिवाय ‘आज मै उपर आसमाँ नीचे’ या
रेणु गावस्कर यांच्या लेखातील मुलीने परिस्थितीशी झुंज देत मिळविलेले यश अभिनंदनीय वाटले, नि:स्पृह व्यक्तींची अधिक माहितीही दिली असती तर तो लेख परिपूर्ण झाला असता, असे मात्र वाटते.
– प्रदीप करमरकर, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 1:01 am

Web Title: readers response 97
Next Stories
1 खरोखरच प्रेरणादायी
2 बंडखोरीचे झेंडे फडकत राहू द्यात
3 माणुसकी जागवली
Just Now!
X