News Flash

मग गुन्ह्य़ाला जात कशी?

‘मराठा समाजाला नेमकं हवंय तरी काय’ ही कव्हरस्टोरी वाचली (२३ सप्टेंबर).

‘मराठा समाजाला नेमकं हवंय तरी काय’ ही कव्हरस्टोरी वाचली (२३ सप्टेंबर). महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय नेतृत्व प्रागतिकतेच्या आणि पुरोगामित्वाच्या नावे सतत कंठशोष करत असले तरी प्रत्यक्षातील गोष्टी पाहून आश्चर्य वाटते. कोपर्डी प्रकरणापासून सुरू झालेला विषय आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी अशा वळणावर गेला. आज कुठल्याही घृणास्पद गुन्ह्य़ाकडे आपण केवळ ‘गुन्हा’ म्हणून पाहू शकत नाही. तो कोणी कोणाविरुद्ध केला आहे हे समजून घेतल्यावरच आपल्या रागाचा पारा किती वर-खाली जायचे ते ठरवतो. त्या गुन्ह्य़ापेक्षाही हे जास्त घृणास्पद आहे. ‘दहशतवादाला धर्म नसतो’ असा जप सतत करणारे नेते गुन्ह्य़ाला जात चिकटवताना मागेपुढे पाहत नाहीत. वास्तविक ‘दहशतवादाला धर्म नसतो’ तशीच ‘गुन्ह्य़ालाही जात नसते’ असा सारासार विचार नेत्यांकडून समाजाला दिला जावा अशी अपेक्षा आहे. पण ते शक्य दिसत नाही. गुन्ह्य़ाला केवळ गुन्हा म्हणून पाहण्याचा हा विवेकी विचार आता मूक सामान्य जनतेनेच आपापल्या नेत्यांना द्यावा.
– प्रसाद दीक्षित, ठाणे.

अप्रतिम कथा
असं म्हणतात की आपला मेंदू मनाची, शरीराची गरज म्हणून स्वत:च संगीत निर्माण करतो. ‘म्यूझिक सिंड्रोम’ असं त्याला मनोवैज्ञानिक भाषेत म्हटलं जातं. म्हणूनच ‘एका आडाण्यावरून’ या सुमन फडकेंच्या कथेतील (‘लोकप्रभा’ ७ ऑक्टोबर) मफिलीसारख्या संगीताच्या मफिली गाजतात. गायक, वादक, श्रोते, गुरू, शिष्य सगळेच जण नकळत समरसून, एकरूप होऊन जातात.

प्रत्यक्ष मफिलीतील गाणे न ऐकविता; संगीतशास्त्र, काव्यशास्त्र, गायक, गुरू आणि महत्त्वाचे अर्थातच श्रोते यांचं मनोहारी कल्पनाचित्र सुमन फडके यांनी बहारदारपणे उभे केले आहे. याचे वर्णन किंचित गमतीशीर पण विषयाची आब राखून, मफिलीतल्या प्रत्येकाचा मान राखून!

कथेचे बीज कोठे सापडले तर रागाच्या नावात ‘आडाणा’. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी एक बंदीश आहे पण ती ‘कंस’ रागात! पुढे भीम, पिलू, िझजोटी. असा रागांचा चेष्टेखोर प्रवास तसाच चालू राहतो! सरतेशेवटी माझाच कुणी सहोदर मनापासून म्हणतो ‘जो डोळ्यात पाणी आणतो तो असावरी आणि उल्हसित करतो तो वसंत..’ मफील खरी समेवर येते ती इथे!
– अनिल ओढेकर, नासिक.

सेलिब्रिटी सदर वाचनीय
सेलिब्रिटी सदरामधील लेख अतिशय वाचनीय असतात. याआधीच्या सदरामध्ये नेहा महाजन यांनी थेडक्यात, पण अतिशय संवेदनशील लिखाण केलं होतं. त्यांच्याही आधी तेजश्री प्रधान यांनी अतिशय सुंदर लेख लिहिले होते.

आता क्षितिज पटवर्धन यांनी हे सदर आणखी एक पाऊल पुढे नेले आहे. त्यांचा गणेशोत्सवावरचा पहिलाच लेख ते सिद्धहस्त लेखक आहेत हे लक्षात आणून देणारा होता. त्यापुढचेही सगळे लेख वाचायला मजा आली.

‘लोकप्रभा’ला एक विनंती आहे की याआधीच्या सेलिब्रिटी लेखकांचे सदर थोडय़ा काळाने थांबले आणि नव्या सेलिब्रिटीचे सदर सुरू झाले. तसे न करता एकेकाला जास्त काळ लिहायला द्यावे.
– संदेश भोसले, चिंचवड, पुणे.

पुन्हा एकदा सिद्ध व्हा…
प्रा. डॉ. परशुराम गिमेकर यांचा ‘तुफान उठवण्याची क्षमता’ हा लेख वाचला. त्यांनी तो चांगला लिहिला आहे. पण मला असं वाटतं की, दलितांना आणि त्यांच्या साहित्याला आता कात टाकून पुन्हा जोमाने उभे राहण्याची वेळ आली आहे. दलित चळवळ ही सर्व बहुजनांची चळवळ आहे, हे पटवून द्यावे लागेल. ती आणखी व्यापक, सर्वसमावेशक करावी लागेल. आणि सर्व बहुजनांचे जुने आणि नवीन प्रश्न पुन्हा मांडायला सुरुवात करावी लागेल. पुन्हा बहुजनांमधील शोषितांच्या, अत्याचाराचे बळी पडलेल्यांच्या आणि गरिबीत होरपळत असलेल्यांच्या हातात हात देऊन त्यांना उभे करावे लागेल. कारण बाबासाहेबांचे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कात टाकून पुन्हा लढावे लागेल.
– कृष्णा म्हस्के (ई-मेलवरून)

 कारवी खरंच पाच वर्षांनंतर?
‘आसमंतातून’ या सदरातून निरनिराळ्या वनस्पतींबद्दल देत असलेल्या माहितीबद्दल रूपाली पारखे-देिशगकर यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.
– सुभाष मयेकर, बाणेर, पुणे.

संग्राह्य़ व वाचनीय
मी एक साधी गृहिणी आहे. दुपारची आवराआवर झाली की विरंगुळा म्हणून वाचण्यासाठी वर्तमानपत्र असतेच. पण त्याचबरोबर ‘लोकप्रभा’ वाचण्यास सुरुवात केली. खरोखरच त्यातून मला विविध विषयांवरील विचारप्रवर्तक लेख वाचयला मिळाले. विशेषत: १६ सप्टेंबरच्या अंकात गणेशाची विविध स्थानांसंबंधी महत्त्वाची माहिती मिळाली. तो अंक मी संग्रही ठेवला आहे. २३ सप्टेंबरच्या अंकातील हिरकणीच्या लेकींची गोष्ट, चित्रवार्ता, बहिणींची जुगलबंदी व इतर लेख आवडले. ‘लोकप्रभा’तून चुटकेदेखील द्यावेत अशी अपेक्षा आहे.
– मीरा दातार, नाशिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2016 1:01 am

Web Title: readers response 125
Next Stories
1 एकटेपणाचा निदर्शक सेल्फी
2 पण खंत तर उरतेच ना..?
3 म्हणून गणेशोत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थीला…
Just Now!
X