15 August 2020

News Flash

पिझ्झा-बर्गर संस्कृतीशी लढाई

अमेरिकाशरण अशा एका संस्कृतीचा आपल्याकडे केव्हाच उदय झाला आहे.

वसईत ख्रिसमसला केल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण तसंच वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाविषयी ‘लोकप्रभा’च्या ख्रिसमस विशेषांकात वाचले. आपल्याकडे जातीनुसार, धर्मानुसार जशा विविध प्रथा-परंपरा आहेत, तसेच खाद्यपदार्थही आहेत. त्यांचं वैविध्य खरोखरच थक्क करणारं आहे; पण या सगळ्याच्या डॉक्युमेंटेशनमध्ये आपण खरोखरच कमी पडतो; पण ही गोष्ट आपल्याला आज जाणवणार नाही की कळणारही नाही. आणखी शंभरेक वर्षांनी हा सगळा ठेवा हळूहळू नष्ट होत गेला असेल आणि आपण खडबडून जागे होऊ. कुणाला असं म्हणणं हे फुकटची नकारघंटा वाटेल, पण आज आपल्या आसपासची परिस्थिती पाहिली तर असं दिसतं की, ज्यांनी ही खाद्यपरंपरा टिकवून धरली, त्या स्त्रियांचा आज त्यातला रस कमी होत चालला आहे. दुसरीकडे पिझ्झा-बर्गर संस्कृतीने आपल्या तरुणाईला कमालीची भुरळ घातली आहे. त्यांना आपले पदार्थ नकोत, आपली संस्कृती नको. अमेरिकाशरण अशा एका संस्कृतीचा आपल्याकडे केव्हाच उदय झाला आहे. ती ओसरायला शंभर-दोनशे वर्षे जावी लागतील. तोपर्यंत पुरेसे सांस्कृतिक सपाटीकरण झालेले असेल आणि मग तेव्हाची पिढी खडबडून जागी होऊन आपली मुळं शोधायला लागेल आणि पुन्हा आपल्या खाद्यपदार्थाना चांगले दिवस येतील अशी आशा आहे.
– उत्तरा आराध्ये, पुणे

नाताळ विशेषांक आवडला
नाताळ आणि नववर्षांचं स्वागत करणारा ‘लोकप्रभा’चा विशेषांक  प्रथमदर्शनी मुखपृष्ठामुळे आवडला. नाताळ या ख्रिश्चनांच्या सणात ख्रिसमस ट्री, केक, सेलिब्रेशन असते इतपतच खरे तर माहिती असते. या विशेषांकामुळे नाताळाची बरीच माहिती मिळाली. इतकेच नाही तर महाराष्ट्रातील ख्रिसमस जाणवला. फिनलॅण्डचा नाताळ तर विशेष भावला. व्हाइट ख्रिसमस भावला. चर्चेसवर विशेषत: त्यांच्या स्थापत्यशैलीवर अजून थोडे विस्तृत आणि अभ्यासू लिखाण अपेक्षित होते. नाताळाच्या निमित्ताने केले जाणारे खाद्यपदार्थ तर आम्ही करूनदेखील पाहिले.
– अंजली जोशी, पुणे.

ख्रिसमस विशेषांकात वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिसमस कसा साजरा होतो ते वाचले. त्यातही वसईतला ख्रिसमस अधिक भावला.
– प्रिया राणे, कळवा, ठाणे.

वाचनीय म्यानमार
म्यानमार हा देश तसा पर्यटनासाठी फारसा प्रसिद्ध नाही. पण रमेश करकरे यांनी केलेली म्यानमारची सफर वाचून म्यानमारला जायला हवे असे वाटायला लागले आहे. युरोप, अमेरिका ऑस्ट्रेलिया अशा देशांपेक्षा म्यानमारला जायला हवे. ‘लोकप्रभा’ने अशा पर्यटन स्थळांची माहिती वारंवार द्यावी.
– किरण जगदाळे, विटा.

वृत्ती कुठे सुधारते!
‘लोकप्रभा’चा लग्न विशेषांक वाचला. ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदवणं, लग्न जुळवणं या सगळ्या संदर्भातले लेख वाचले. चांगली गोष्ट म्हणजे ‘लोकप्रभा’ने ना अशा मॅट्रिमोनिअल साइट्सचं कौतुक केलं आहे, ना त्यांच्यावर टीका केली आहे. फक्त आहे ती परिस्थिती मांडून दाखवली आहे. माध्यमांचं हेच तर काम आहे; पण खरं सांगायचं तर जे कुणी मॅट्रिमोनिअल साइट्सचं कौतुक करतात, ते टीव्हीवर रामायण सुरू झाल्यावर टीव्हीला फुलं-हळदीकुंकू वाहणाऱ्या किंवा गणपतीला दूध पाजणाऱ्यांच्या पंथातले आहेत, असं म्हणायला हवं, कारण लग्न ऑनलाइन नोंदवलं किंवा जुळवलं म्हणजे तंत्रज्ञानाचा आधार घेतला म्हणून आपण सुधारलो असं होत नाही. बाकी लग्नाच्या बाबतीतली मानसिकता तीच आहे. उद्या हेच लोक मंगळावर जाऊन आलेल्या एखाद्या शास्त्रज्ञ मुलगा किंवा मुलीच्या पत्रिकेत कसा मंगळ आहे, याची चर्चा करायला कमी करणार नाहीत.
– संजय विचारे, डहाणू.

रायबांवरचा लेख आवडला
ब्रॅिण्डग न झालेला ब्रॅण्ड हा चित्रकार रायबा यांच्या कारकीर्दीकडे पाहिल्यावर माणसामध्ये किती चिकाटी असावी याची जाणीव होते. कलंदर वृत्ती असली तरी कलेवरची निष्ठा ढासळू न देणं म्हणजे काय हे कळलं. अशी माणसंच खरं दर्जेदार काम करतात. ब्रॅण्डिंग ही आज काळाची गरज झाली आहे. पण त्यांच्यातील मनस्वी कलाकारामुळे हे ब्रॅिण्डग झाले नसावे. पण अखेपर्यंत त्यांनी जोपासलेली प्रयोगशीलता हीच त्यांची ओळख म्हणावी लागेल. अशा कलाकारावर लेख प्रसिद्ध केल्याबद्दल ‘लोकप्रभा’ला धन्यवाद.
– शाल्मली काळे, ई-मेलवरून.

अननुभवी लोकांचे निर्णय
‘नोटाबंदी’ या विषयावरील ‘लोकप्रभा’तील तसंच इतरत्र आलेले वेगवेगळे लेख वाचले. खरं तर त्या सगळ्यातून मनातला गोंधळ कमी होण्याऐवजी वाढला आहे. एकीकडे पंतप्रधानांनी अचानक जाहीर केलेल्या निर्णयाचे त्या वेळी कौतुक वाटले होते. असं काहीतरी केल्याशिवाय आपल्या देशात निर्णायक बदल होणार नाहीत, अशी भावना निर्माण झाली होती. त्यामुळे एटीएमच्या, बँकांच्या दारात रांगा लावून उभं राहणं देशभक्तीशी जोडण्यावरून जी टिंगल झाली तिचा सुरुवातीला रागही आला होता. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसं मत बदलत गेलं. निश्चलनीकरणाला काळ्या पैशाविरुद्धच्या लढाईशी जोडणाऱ्या सरकारनेही नंतर कोलांटउडय़ा खाल्ल्या. काळ्या पैशाविरुद्धची लढाई नंतर कॅशलेसवर आली. पन्नास दिवसांच्या कालावधीत इतरांचे मत काय झाले आहे, माहीत नाही. माझे तरी मत असे झाले आहे की भारत हा देश काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे, तो कसा चालवायला हवा, त्याचे नेमके प्रश्न काय आहेत याची फारशी काहीही कल्पना नसलेल्यांच्या हातात देश गेला आहे. अन्यथ़ा लोकांना जराही त्रास न होता निश्चलनीकरण कसे करायचे, याचा विचार झाला असता आणि मग ती सगळी प्रक्रिया झाली असती, असे वाटते.
– गोविंद तळेकर, कोल्हापूर.

आमची झापडं उघडाल तर खबरदार!
‘लोकप्रभा’तून प्रसिद्ध होणारे ट्रेकिंग तसंच पर्यटनविषयक सगळे लेख मी नियमित वाचतो. त्यातले ट्रेकर्स पट्टीचे डोंगरभटके आहेत, तर पर्यटनविषयक लेखांमध्ये गौरी बोरकरांसारख्या पट्टीच्या पर्यटक. हे सगळे लेख आम्हा पामरांना आम्ही किती रुटीनचक्रात अडकलो आहोत, याचे गिल्ट फीलिंग देतात. तेव्हा कृपा करा आणि असे लेख प्रसिद्ध करणं थांबवा. आयफेल टॉवरच्या टोकावर उभं असताना आम्हाला आमच्या टूर ऑपरेटरने कशा गरमागरम पुरणपोळ्या खायल्या दिल्या आणि ऐन मेमध्ये आफ्रिकेच्या जंगलात चिंपांझी बघताना आम्ही आमच्या टूर ऑपरेटरच्या कृपेने कसा रत्नागिरीच्या हापूस आंब्यांचा आमरस चापला असली वर्णनं असलेले पर्यटनविषयक लेखच प्रसिद्ध करा. आमची झापडं उघडाल तर खबरदार!
– गौरव पवार, पिंपरी-चिंचवड

ओवी थोरात आणि रुपाली पारखे या दोघींचेही पर्यावरणावरचे लेख वाचून खूप चांगली आणि वेगळी माहिती मिळते. जंगल, निसर्ग यांच्याबद्दल त्या लेखांमुळे वेगळी दृष्टी मिळाली आहे.
– प्रतीक चवले, सातारा.

‘फुलाला गंध घामाचा’ ही ‘लोकप्रभा’मधली कथा चटका लावून गेली. मातीत घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला, त्याच्या श्रमांना प्रतिष्ठा द्यायला नकार देणारे आपण करंटे आहोत. दुसरं काय?
– प्रभाकर कदम, भिवंडी.

‘लोकप्रभा’चे मुखपृष्ठ आणि त्यावरील मथळा नेहमीच आकर्षक आणि उत्सुकता वाढवणारा असतो.
– दिनेश भगत, माढा.

गीतांजली कुलकर्णी यांचे अनुभव एकदम सुंदर आहेत. त्यांच्या नाटकांच्या दौऱ्याचे अनुभव वाचून त्या ठिकाणांना भेट देण्याची इच्छा होत आहे. आपले आणखीन अनुभव वाचायला आवडतील. त्यांचे  नाटकही पाहायला आवडेल.
– दामिनी जाधव, ई-मेलवरून.

‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही दीपक आपटे यांची कथा आवडली.
– रागिणी वाटवे, पुणे.

‘भलत्या शोचे सलते परीक्षक’ हा २६ नोव्हेंबरच्या अंकातील लेख आवडला.
– शुभांकर जठार, ई-मेईलवरून.

कॉर्पोरेट कथा या सदरातील देशप्रेम हा लेख अगदी सत्य परिस्थिती सांगणारा आहे.
– प्रकाश पिराले, ई-मेलवरून.

माझे काबूलमधील दिवस हा दिवाळी अंकातील आनंद कानिटकरांनी लिहिलेला लेख खूप भावला. आपल्या धाडसाबद्दल व कामगिरीबद्दल अभिनंदन. अफगाणिस्तानबद्दलचे कुतूहल थोडे का होईना शमले.
– झाकीर हुसेन संदे, ई-मेलवरून.

‘अनोखे वळण’ ही दिवाळी अंकातील कथा खूपच उत्तम आहे. असं लिखाण करायची इच्छा आहे.
– राजू शिंदे, ई-मेलवरून.

मी लोकप्रभाची नियमित वाचक आहे. यावेळचा गणेश विशेषांक छान व वाचनीय होतेच, पण दसरा विशेषांक अप्रतिम आहे. विविध प्रदेशातील दसऱ्याचा आनंद तर मिळालाच, पण अनेक ठिकाणच्या देवींची उत्तम माहिती वाचायला मिळाली. त्यामुळे मनाला फार आनंद व समाधान मिळाले. सुंदर अंकाबद्दल धन्यवाद.
– अरुणा महाळंक, पुणे, ई-मेलवरून.

‘लोकप्रभा’तून टीव्ही मालिका, मराठी सिनेमे या क्षेत्रांत काय चालले आहे याबद्दल समजते. मनोरंजन क्षेत्रातील सेलेब्रिटी लिहितात, तेही वाचायला आवडते. ‘लोकप्रभा’ने हिंदूी सिनेमाविषयीच्या लेखांचे प्रमाणही वाढवावे.
– रोहित पालव, इंदापूर.

मराठी सिनेमा, मराठी मालिका याबद्दल ‘लोकप्रभा’तून बऱ्यापैकी माहिती मिळते. खरं तर त्याहीपेक्षा किती तरी जास्त घडामोडी क्रीडा क्षेत्रात घडत असतात. त्याबद्दल दोनच पाने. असं का? क्रीडाविषयक आणखी माहितीची अपेक्षा आहे.
– कुमार माने, कोल्हापूर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2017 1:01 am

Web Title: readers response 134
Next Stories
1 तरुणाईचे असे का झाले?
2 उद्देश आणि नियोजन यांची कसरत
3 लग्न विशेषांक आवडला
Just Now!
X