05 August 2020

News Flash

नानांचं ‘एकाकी’पण

‘‘आपण तिघं नाना रासनेंकडे जाऊन येऊ. एकटे पडले आहेत.

‘‘आपण तिघं नाना रासनेंकडे जाऊन येऊ. एकटे पडले आहेत. गुडघ्यांनी त्यांना हैराण केलं आहे. ते एक पाऊलही उचलू शकत नाहीत’’, ओक म्हणाले. मी विचारलं, ‘‘चार पावलांवर श्रीखंडाची वाटी असेल तर नाना ती घेऊ शकत नाहीत?’’

‘‘मोकाशी, आधार नसेल तर ते एक पाऊलही उचलू शकत नाहीत, चार पावलांवरची श्रीखंडाची वाटी ते कशी घेणार?’’ नानांच्या कठीण स्थितीची मला खाडकन् कल्पना आली. मी अनुमोदन दिलं, ‘‘जाऊ या. फोन करून रविवारी येतो म्हणून कळवा. दुपारची पाचची वेळ उत्तम. रविवारी नानांचा मुलगा, सून, नातू, नातसून, सारे घरी असतात. चहा-बिस्किटं देण्याकरिता नानांना तसदी नको.’’

ओक तिरसटले, ‘‘मोकाशी, आपण चौकशी करायला चाललो आहोत, चहा- बिस्किटांना भेटायला नाही.’’

माझी चूक मला समजली. समजूतदारपणे माघार घेत मी म्हणालो, ‘‘ओक, तुमचं म्हणणं रीतसर आहे. नानांच्या सूनबाईंना कळवून टाका की, आम्ही फक्त नानांची (वय ८३) विचारपूस करणार, चहा-बिस्किटं, पोहे-शिरा वगैरे काहीही घेणार नाही.’’

ओक म्हणाले, ‘‘नानांच्या पत्नी चार वर्षांपूर्वी गेल्या. त्या दु:खातून नाना बाहेर आले तोवर त्यांना गुडघेदुखीनं धरलं. आपण सारे तसे या वयात पिकल्या फळाप्रमाणे आहोत. गळून खाली पडणारच. मरणाचं भय नाही; पण अलगद जावं, गुडघेदुखी वगैरे त्रास नको. ‘यथा फलानाम् पक्वानाम् न अन्यत्र पतनात् भयम्। तथा नरस्य जातस्य न अन्यत्र मरणात् भयम्॥’’’

मी तत्परतेनं परबांकडं पाहिलं. माझं पाहणं फुकट गेलं नाही. ‘‘तुका म्हणे,’’ परबांनी तोंड उघडलं, ‘‘आम्हां विठ्ठलभक्तांना मृत्यूचं भय नाही, आम्ही विठ्ठलचरणी असतो, त्यामुळे एकाकीही नसतो. ‘मरणा हाती सुटली काया। विचारे या निश्चये॥ नासोनिया गेली खंती। सहजस्थिती भोगाचीचे॥ तुका म्हणे कैची कीव। कोठे जीव निराळा॥’ मोकाशी, विठ्ठल माझी आई आहे हा विचार पक्का झाला की मरणाच्या तावडीतून आपलं शरीर सुटतं. आहे ती स्थिती मजेत भोगायची, खंत म्हणून करायची नाही. आपण विठ्ठलाहून वेगळे नाही हे समजलं की स्वत:विषयी कीव बाळगायची गरजच काय?’’

मला स्वत:ची आणि स्वत:च्या बी.ए. (ऑनर्स) या पदवीची कीव वाटली. परबांना तुकोबांचा अभंग माहीत आहे, अभंगाचा अर्थही माहीत आहे आणि त्याही वरती परब हे सर्व आचरणात आणतात! कमाल आहे!! असा अंतर्बाह्य़ सचोटीचा गृहस्थ सध्याच्या या काळात, गोत्यात न येता, सुखरूप जगला तरी कसा?

असो. मी ओकांना विचारलं, ‘‘नानांना एकटं एकटं कोणत्या कारणामुळं वाटतं?’’

ओकांनी खुलासा केला, ‘‘नाना पत्नीसह दोन खोल्यांत राहत होते. नानांच्या इमारतीला लिफ्ट होती. नानांचा मुलगा, सून, नातू, नातसून दुसऱ्या इमारतीत तीन खोल्यांत राहत होते. त्या इमारतीला लिफ्ट नव्हती. पत्नीच्या मृत्यूनंतर, नानांना मुलासुनेजवळ राहायचं होतं. नाना सर्वाना, लिफ्टची सोय असलेल्या, आपल्या दोन खोल्यांत राहायला या म्हणून बोलावत होते. दोन खोल्यांत एवढी माणसं कशी राहणार? मुलगा आणि सून नानांना त्यांच्याकडे या म्हणून विनवत होते. नानांचे गुडघे निकामी झाले आहेत. ते मुलाच्या चौथ्या मजल्यावरच्या, लिफ्ट नसलेल्या तीन खोल्यांत पोचणार कसे? मुलगा-सून म्हणाले, ‘तुम्ही नुसते खुर्चीत बसा. हमाल तुम्हाला खुर्चीसकट वर आणतील.’ नाना म्हणाले, ‘उद्या माझे गुडघे त्यातल्या त्यात ठीक झाले तर? तुझ्या इमारतीला लिफ्ट नाही. मी कायमचा वर अडकून पडेन.’ नानांच्या मुलानं धडपडून, पैशांची जुळवाजुळव करून, लिफ्ट असलेल्या इमारतीत मोठा ब्लॉक खरेदी केला. नव्या ब्लॉकमध्ये नानांना स्वतंत्र, टॉयलेटची जोड असलेली खोली मिळाली आहे. अशी उत्तम सोय झाल्यावरही, ‘मी एकटा पडलो आहे,’ असं नाना कळवळून सर्व मित्रांना का सांगत आहेत? काही कळत नाही.’’

मी खात्रीचा अंदाज व्यक्त केला, ‘‘नानांची खोली ब्लॉकच्या एका कडेला असणार, त्या खोलीला खिडकीच नसणार, खोली किचनपासून खूप दूर असणार, नानांनी हाकांवर हाका मारल्या तरी कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नसणार.’’ मी हा अंदाज सहज व्यक्त केला, कारण मीच तसा घरात एकटा पडलो आहे! माझ्याकडे घरात कोणी लक्ष म्हणून देत नाही. खाणारे कोटी कोटी रुपये खातात, मी खरवस, श्रीखंड, शिरा असे काही किरकोळ पदार्थ मागितले तर बायकोच मुळी सर्वाना सांगते, ‘जराही लक्ष देऊ नका. मधुमेहाच्या रोग्यानं गोड पदार्थ खाऊ नयेत हे यांना सांगणार कोण?’ मध्यरात्री मी का उठतो, ‘असून खास मालक घरचा’ चोराप्रमाणे फ्रिज का उघडतो हे प्रश्न मला विचारू नका. छळवादी कुटुंबात गुण्यागोविंदाने राहायचे तर, बत्तीस वर्षे इमानाने शासकीय नोकरी करणाऱ्याला, असे चौर्यभक्षण करावेच लागते.

नानांच्या मुलानं दहाव्या मजल्यावर मोठा फ्लॅट घेतला होता. नानांच्या खोलीकडं गेलो. नानांची स्वतंत्र खोली ब्लॉकच्या मध्यावर, किचनला लागूनच होती. नानांनी आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवायला सांगितला. शिजणाऱ्या सर्व पदार्थाचे ताजे वास आणि नंतर गरम पदार्थ नानांपर्यंत येतात. गुडघ्यामुळे नानांची हालचाल जवळजवळ बंद होती. त्यामुळे नानांसाठी केअरटेकर बाई ठेवली होती. नानांनी चवथ्या-पाचव्या वेळी चहा मागितला तरी, ‘आता चहा मिळणार नाही’ असं ती ठणकावून सांगत तर नाहीच, वरती लहान कपभर हवा की मोठा हे अदबीने विचारते. नानांच्या खोलीत त्यांच्यासाठी स्वतंत्र टीव्ही आणि रेडिओ होता. नानांचे चिरंजीव म्हणाले, ‘‘आम्हा सर्वाकरिता टीव्ही, रेडिओ बाहेरच्या खोलीत आहे.’’ मी नानांच्या काळजीपोटी प्रश्न टाकला, ‘‘तुम्ही सारे बाहेरच्या खोलीत टीव्ही लावणार, गोंगाट करणार. अशा गोंगाटात नानांना काही हवं असेल तर त्यांच्या हाका तुमच्यापर्यंत पोहोचणार कशा?’’ चिरंजीव म्हणाले, ‘‘नानांच्या बेडजवळ एक बटण आहे. ते प्रेस केलं की एका वेळी तीन खोल्यांत घंटा वाजते.’’ नवी नातसून म्हणाली, ‘‘या घंटांची एक गंमत आहे. नाना दिवसातून दोन-तीन वेळा चुकून बटन प्रेस करतात, तेव्हाही घंटा वाजतात.’’ ‘‘नानांना ब्लॉकभर हिंडावं वाटलं तर वॉकर आहे. केअरटेकर सकाळी ८ ते रात्री ८ असते. नोकरीसाठी घरचे चारही जण घराबाहेर असतात, पण नाना एकटे नसतात, केअरटेकर बाई असतात. लादी पुसणाऱ्या, भांडी घासणाऱ्या, कपडे धुणाऱ्या, पोळ्या करणाऱ्या कामवाल्या स्त्रिया त्यांच्या त्यांच्या वेळी येतात. ‘आलात की आणि जाताना, नानांची चौकशी न विसरता करायचीच हे मी सर्वाना सांगून ठेवलं आहे.’ ही माहिती मला नानांच्या सूनबाईंनी दिली. नानांना एकटं गाठून, हलक्या आवाजात मी नानांना विचारलं, ‘‘तुम्हाला घरची मंडळी एकटं पाडतात म्हणजे काय करतात?’’ नाना उत्तरले, ‘‘आज रविवार आहे, म्हणून सारे घरी आहेत. एरवी रोज नोकरीच्या नावाखाली चारही जण घराबाहेर जातात, मी एकटा पडतो. श्रीखंड चाटावंसं वाटलं तर केअरटेकरबाई आणून देतात, पण मी एकटा पडतो त्याचं काय?’’

नानांचे चिरंजीव, सूनबाई, सर्व मंडळी आतिथ्यशील होती. पोहे, शिरा, चहा बिस्किटं हे पदार्थ भरपूर आणि रुचकर होते. मुख्य म्हणजे साजूक तुपातील, बदाम-बेदाणे घातलेला गोड शिरा मला विशेष आवडला.

परतताना मी परबांना विचारलं, ‘‘नानांप्रमाणे मलाही एकाकी, सुखात पिचत पडायचं आहे. त्यासाठी किती शेकडा विठ्ठल, विठ्ठल म्हणावं लागेल?’’

कधी नव्हे ते संत परब संतापले, ‘‘अधमाचे चित्त, अहंकारी मन। उपदेश शीण तया केला॥ तुका म्हणे तेसे अभाविका सांगता। वाडगाचि चित्ता सीण होय॥’’

अखंड करावयाचे विठ्ठलनाम, मी शेकडय़ात मोजले याचा परबांना राग आला असावा. परबांचा तोल गेला. परबांना हे शोभणारे नाही. विठ्ठला, परबांना क्षमा कर. ‘अधम, अहंकारी मनाचा’ हे अपशब्द मला उगाचच ऐकावे लागले. एकूण माझा दिवस बरा गेला नाही. साजूक तुपातील, बदाम-बेदाणे घातलेला गोड शिरा हीच काय ती उपलब्धी ठरली. नानांचे सुखाचे एकाकीपण माझ्या दैवात नाही!

भा.ल. महाबळ

chaturang@expressindia.com

(सदर समाप्त)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2017 5:17 am

Web Title: b l mahabal loksatta chaturang marathi articles part 9
Next Stories
1 निवडणूक
2 आनंदरंग
3 संगीतसेवक
Just Now!
X