पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून केले जाणारे वारी व्यवस्थापन, तसेच दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देण्यासाठी ‘पालखी सोहळा २०१७’ हे मोबाईल अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे. या अ‍ॅपमध्ये व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना असे तीन विभाग करण्यात आले असून त्यामध्ये विविध पर्याय देण्यात आले आहेत. या अ‍ॅपला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला असून तीन दिवसात बाराशेजणांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून चोवीस तास श्री विठ्ठल-रखुमाईचे ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. हे अ‍ॅप १२ जूनपासून सर्वासाठी खुले करण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त ९ जुलैपर्यंतच्या कालावधीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना अ‍ॅपद्वारे व्यवस्थापनाची माहिती घेता येणार आहे. तसेच अ‍ॅप वापरणे शक्य नसणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी सोहळ्याच्या नियोजनातील व्यक्तींचे दूरध्वनी क्रमांक व इतर माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेच्या दोन हजार प्रतींचे वितरण करण्यात येणार आहे.

पुणे, सोलापूर आणि सातारा या तीनही जिल्ह्य़ातील सोई-सुविधांची माहिती या अ‍ॅपमध्ये आहे. तसेच देहू, आळंदी, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा प्रमुख, दिंडी प्रमुख, जिल्हाधिकारी, सर्व तहसीलदार, आरोग्य केंद्र, नियंत्रण कक्ष इत्यादींचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर, आरोग्य, धान्य, रॉकेल, सिलेंडर पुरवठा आदी सुविधा दिल्या जातात. या आणि अन्य आवश्यक सुविधांची माहिती या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. एखादी व्यक्ती हरवल्यास ‘आपण यांना पाहिलंत का?’ या पयार्याचा समावेशही करण्यात आला आहे. पालखी दरम्यान होणाऱ्या असुविधांबाबत अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारही करता येणार आहे.

अ‍ॅपची वैशिष्टय़

  • दोन्ही पालख्यांचा मार्ग, मुक्काम यांचे दिनांक वारांसह टँकर सुविधांची माहिती, टँकर भरण्याची ठिकाणे
  • जिल्हा स्तरावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक
  • शहर, ग्रामीण व तालुका स्तरावरील पोलीस ठाण्यांची नावे व दूरध्वनी क्रमांक
  • पोलीस, रुग्णवाहिका, आपत्ती, व्यवस्थापन विभागांचे क्रमांक