सायंकाळी चारनंतर छुप्या पद्धतीने दुकाने सुरूच; गर्दीमुळे करोनाला आमंत्रण

विरार : वसई विरार शहरात करोना दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत असला तरी रुग्ण संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. पालिकेने दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताच अर्थचक्राला गती मिळावी यासाठी सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ पर्यंत मुभा दिली आहे. पण पालिकेचा नियम धाब्यावर बसवून अनेक दुकाने चारनंतरही मागील बाजूने खुली ठेवली जात आहेत. यामुळे नागरिकांची गर्दी वाढत आहे. नियम डावलले जात असल्याने करोना प्रादुर्भावाची भीती वाढली आहे.

वसई विरार परिसरात करोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. वाढती रुग्णसंख्या पाहता शहरातमध्ये कडक निर्बंध लादले होते. सलग वर्षभरापासून टाळेबंदीचा सामना केल्याने व्यापारी वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण होते. त्यात आर्थिक तंगीचा मोठा फटका व्यापाऱ्यांना सहज करावा लागत आहे. यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरू लागताच पालिकेने शहरातील टाळेबंदीचे नियम शिथिल करत सर्व दुकानांना सायंकाळी ४ पर्यंत परवानगी दिली आहे. पण व्यापारी याचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून आले आहे.

संध्याकाळी ४ नंतरही दुकानाचे शटर अर्धे उघडे ठेवून ते व्यवसाय करत आहेत. यात विरारमधील एका दुकानदाराने माहिती दिली की, लोक सकाळी कामावर जातात आणि संध्याकाळी सहा-सातनंतर परतात. तसेच शनिवार, रविवार दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्यास सांगितले आहेत. यामुळे व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. म्हणून दुकानदार नियमभंग करून धंदा करत आहेत.

वसई-विरार शहरात नियम पाळले जात नसल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने छुप्या पद्धतीने सुरू असल्याने सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची सतत रस्त्यांवर वर्दळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली परवानगी नसतानाही आठवडे बाजार भरवले जात आहेत. अशा बाजारात मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळत आहे. यात करोना नियम व्यापारी आणि नागरिकांकडून पायदळी तुडवले जात आहेत.  अंतर नियम, मुखपट्टय़ा, स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळत असल्याचे प्रा. गौतम मस्के यांनी सांगितले. मस्के यांनी सांगितले की, ज्या प्रमाणात सध्या सर्वच ठिकाणी गर्दी उसळत आहे. यामुळे करोना प्रसार पुन्हा वाढला जाऊ शकतो. म्हणून पालिका आणि पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.

सायंकाळनंतरही येथे गर्दी

विरार पूर्व परिसरातील चंदनसार, फुलपाडा, कारगिल नगर, रेल्वे स्थानक परिसर, नालासोपारा- तुळिंज, टाकी रोड, रेल्वे स्थानक परिसर, ओस्वाल नगरी, महेश पार्क, संतोष भुवन, धानीव, राम नगर, समेळ पाडा, भोईदापाडा, मोरेगाव, हनुमान नगर, बिलाल पाडा, पांडय़े नगर, धानीव बाग, वाकणपाडा,  विजय नगर, प्रगती नगर, अलकापुरी, वसंत नगरी, लिंक रोड, श्रीराम नगर,  आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात चाळी आणि झोपडपट्टी परिसर आहे. इथे व्यापारी तसेच दुकानदार नियम डावलून दुकाने सुरू ठेवत आहेत.

वसई-विरार शहरात नियम पाळले जात नसल्याने मोठय़ा प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. दुकाने छुप्या पद्धतीने सुरू असल्याने सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची रस्त्यांवर वर्दळ पाहायला मिळत आहे.